बेल्हे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गोरक्षनाथ वाघ यांची निवड

नारायणगाव (किरण वाजगे) :- बेल्हे (ता.जुन्नर) गावचे सरपंच राजाभाऊ गुंजाळ यांचे निधन झाल्यामुळे सरपंच पद रिक्त झाले होते. आज सोमवार (दि.३ मे) रोजी सरपंचपदाची निवडणूक पार पडली. या सरपंचपदाच्या जागेवर ग्रामपंचायत सदस्य गोरक्षनाथ रामदास वाघ  यांची निवड झाली.

बेल्हे गावचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सरपंच राजाभाऊ गुंजाळ यांच्या निधनाने सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत गोरक्षनाथ वाघ हे सरपंच झाले. या पदासाठी चार अर्ज आले होते. अर्ज पडताळणीत एक अर्ज बाद झाला तर राष्ट्रवादीच्या लीला बोरचटे यांनी अर्ज माघे घेतला. राष्ट्रवादी पक्षाचे गोरक्षनाथ वाघ व शिवसेनेचे बबन औटी या दोन उमेदवारांसाठी मतदान झाले.

गोरक्षनाथ वाघ यांस १० मते तर बबन औटी यांना ७ मते मिळाली. तीन मताच्या फरकाने  वाघ हे निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी नितीन चौरे यांनी दिली.
दरम्यान ही निवडणूक शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाने प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे यापूर्वी शिवसेनेची सत्ता असताना राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांनी ही निवडणूक जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

Previous articleवयाच्या ७९ व्या वर्षी कोरोनावर यशस्वी मात
Next articleजनावरांची चोरी करणारी अट्टल टोळी जेरबंद