पाण्याची मोटर चालू करताना विजेच्या धक्क्यामुळे विहरीत कोसळून एकाचा मृत्यू

नारायणगाव :- (किरण वाजगे)

नारायणगाव येथील वैदू वस्ती परिसरात पाण्याची विद्युत मोटार चालू करताना विजेचा धक्का लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

सुरेश सखाराम घाडगे (वय ४० ) असे विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून विहिरीवरील पाण्याची मोटर चालू करण्यासाठी गेले असता विजेचा धक्का बसला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने ते थेट शेजारीच असलेल्या विहिरीत कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

या घटनेने वैदू वस्ती परिसरात शोककळा पसरली आहे. आई-वडील वृद्ध असल्यामुळे रोज सकाळी मोटर सुरू करण्यासाठी मयत सुरेश घाडगे हे स्वत: जात असत. परंतु, आज ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी व तीन भाऊ असा परिवार आहे.

वैद वस्ती परिसरात निम्म्या घरांना ग्रामपंचायत नारायणगावचा पाणीपुरवठा होत नाही. आम्ही ग्रामपंचायत नारायणगावला या संदर्भात वेळोवेळी मागणी अर्ज देऊन संपर्क केला. परंतु, त्यांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज ही घटना घडली आहे, असा आरोप वैदू वस्ती येथील यल्लू लोखंडे, हनुमान लोखंडे आदी ग्रामस्थांनी केला आहे.

मागील वर्षी ११ मार्च २०२० रोजी नारायणगाव च्या सरपंचांना वैदू वस्ती येथे पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत अर्ज करण्यात आला होता. परंतु त्यांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज ही घटना घडली आहे, असा आरोप संतप्त झालेल्या वैदूवस्तीमधील ग्रामस्थांनी व मृत्युमुखी पडलेल्या सुरेश घाडगे यांच्या आई वडिलांनी केला आहे.

Previous articleगावगाडा चालवायचा कसा……?                          विकास दादा ठाकुर
Next articleअपूर्वा गोसावी हिने जिंकली महाराष्ट्र हेल्थ हॅकाथॉन स्पर्धा