हनी ट्रॅपचा झाला भांडाफोड ! आमदार दिलीप मोहिते पाटील या़ंना बदनाम करण्यासाठी रचलेला कट उधळला

पुणे जिल्ह्यातील खेड – आळंदी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना बदनाम करण्यासाठी रचण्यात आलेले हनी ट्रॅपचे षडयंत्र साताऱ्यात उघडकीस आले . विशेष म्हणजे एका युवतीनेच या प्रकरणाचा भांडाफोड केला असून या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे . यामध्ये पुणे जिल्ह्यातील दोघांचा तर साताऱ्यातील एकाचा समावेश आहे .

शैलेश शिवाजी मोहिते – पाटील ( रा . सांगवी , जि.पुणे ) , राहूल किसन कांडगे ( रा . चाकण , जि.पुणे ) , सोमनाथ दिलीप शेडगे ( रा.सातारा ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत .

याप्रकरणी मयुर साहेबराव मोहिते – पाटील ( वय ३५ , रा . शेलपिंपळगाव , ता . खेड , जिल्हा पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे . याबाबत मिळालेली माहिती अशी की , या संशयितांनी साताऱ्यातील एका युवतीच्या माध्यमातून आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून बदनामीच्या भितीने त्यांच्याकडून लाखो रूपयांची माया गोळा करण्याचा डाव आखला होता . त्या बदल्यात त्या युवतीला काही रक्कम संशयितांनी दिली होती . मात्र , त्या युवतीनेच संशयितांचा भांडाफोड करून हे प्रकरण उघडकीस आणले .

साताऱ्यातील त्या युवतीने मयुर मोहिते यांना फोन करून या प्रकाराबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने सातारा पोलिसांशी संपर्क साधला . त्यानंतर पोलिसांनी संबंधित युवतीकडे चौकशी केली असता , हा सगळा प्रकार समोर आला .त्या युवतीने चौकशीत दिलेली माहिती अशी की , साताऱ्यात राहणारा सोमनाथ शेडगे हा तिचा मित्र असून त्याच्या ओळखीने शैलेश मोहिते व राहुल कांडगे हे दोघे (दि .१२) एप्रिल रोजी साताऱ्यात संबंधित युवतीला भेटण्यासाठी आले . त्यांनी तिला आपल्याला आमदार मोहिते पाटील यांची बदनामी करायची असून त्यासाठी तुझी मदत पाहिजे असल्याचे सांगितले . त्याबद्ल्यात संशयितांनी त्या युवतीला काही रोख रक्कम व पुण्यात एक फ्लॅट देण्याचे कबुल केले . त्यासाठी तुला त्यांच्याकडे नोकरीच्या बहाण्याने जायचे असून त्यानंतर त्यांच्याशी संपर्क वाढवून त्यांची बदनामी करावी लागेल , असा प्लॅन संशयितांनी युवतीला सांगितला . त्याबदल्यात तीला वेळोवेळी एकूण ९ ० हजार रूपये देण्यात आले . मात्र , हा सगळा प्रकार मनाला न पटल्याने त्या युवतीने आमदारांचे पुतणे व तक्रारदार मयुर मोहिते यांना फोन करून सांगितले , त्यानंतर एकच खळबळ उडाली . सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी या तक्रारीची  गांभीर्याने दखल घेतली . त्यांनी तत्काळ संबंधित युवतीकडे कसून चौकशी करून यातील काही महत्त्वाचे पुरावे हाती घेतले . त्यानंतर संबंधिताविरोधात गुन्हा दाखल केला.याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झाली नव्हती .

युवतीच्या मित्राचाही पैशांमध्ये वाटा !

युवतीचा मित्र सोमनाथ शेडगे याला संशयित आरोपी पैसे देत होते . यातील काही पैसे सोमनाथ शेडगे हा स्वतःजवळ ठेवायचा . त्यानंतर उरलेली रक्कम तो संबंधित युवतीकडे देत होता , असे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे .

Previous articleअसल्या कायद्यांना काय चुलीत घालायचं का…? सरपंच योगेश पाटे
Next articleनियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई