शिक्रापुरात बनावट पद्धतीने सुरु होते कोविड केअर सेंटर

शिक्रापूर/ प्रतिनिधी -शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे मोरया हॉस्पिटल नावाने कोविड केअर सेंटर चालविणारा डॉक्टर बोगस असल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा शिक्रापूर येथे बनावट पद्धतीने हॉस्पिटल चालवून कोविड सेंटर चालविणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफास करण्यात प्रशासनाला यश आले असून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर )येथे आधार हॉस्पिटल नावाने हॉस्पिटल सुरु करून कोणतीही अधिकृत परवानगी नसताना कोविड सेंटर उभारून कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाइकांच्या भीतीचा वापर करून रुग्णांना दाखल करून घेत बनावट पद्धतीने हॉस्पिटल सुरु असल्याची माहिती प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांना मिळाली त्यांनतर शिरूरच्या तहसीलदार लैला शेख, गट विकास अधिकारी विजयसिंह नलावडे, शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर मोरे, तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजिनाथ काशीद, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, तलाठी अविनाश जाधव, आशिष पवार, पोलीस शिपाई प्रफुल्ल सुतार, कृष्णा व्यवहारे यांसह आदींनी त्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता सदर हॉस्पिटल हे डॉ. निखील इंगळे यांच्या नावावर नोंदणी असून येथील रुग्णांवर रामेश्वर बंडगर हा इसम उपचार करत असल्याचे तसेच या ठिकाणी सोळा रुग्ण उपचार घेत असून प्रत्येका कडून सदर डॉक्टरने पन्नास हजार रुपये जमा करून घेतल्याचे तसेच यापैकी फक्त पाच रुग्णांची कोविड तपासणी करण्यात आलेली आहे तर अकरा रुग्णांचे फक्त स्क्यान करून दाखल करून घेतले असल्याचे समोर आले, मात्र सदर ठिकाणी डॉ. निखील इंगळे नावाचा व्यक्ती कधीही आलेला नसल्याचे आजूबाजूचे नागरिक तसेच रुग्णांच्या नातेवाइकांकडून समजले.

यावेळी प्रशासनाने येथील सर्व रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणच्या कोविड सेंटर मध्ये हलविले आहे, तर येथील रामेश्वर विठ्ठलराव बंडगर, गजानन विठ्ठलराव बंडगर, प्रशांत राजाराम मोरे, राहुल बाळासाहेब पवळे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर याबाबत बोलताना सदर प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही कारवाई करून चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर आज उशिरा पर्यंत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले आहे.

हॉस्पिटल आधार नावाने चिठ्ठी मात्र साईधाम नावाने

शिक्रापूर (ता. शिरूर ) येथे प्रशासनाने आज कारवाई केलेल्या हॉस्पिटलचे नाव आधार हॉस्पिटल असून येथे रुग्णांना औषधोपचारासाठी देण्यात येणारी यादी मात्र साईधाम नावाने देण्यात येत असल्याचे अनेक रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांकडून समोर आले आहे.

पाच महिन्यांनापूर्वी याच डॉक्टरने केले होते खंडणीचे गुन्हे दाखल

शिक्रापूर (ता. शिरूर) येथे मागील पाच महिन्यांपूर्वी एका माजी सरपंचासह आदींवर खंडणी व अपहरण प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले असताना सदर हॉस्पिटल चालविणाऱ्या याच रामेश्वर बंडगर याने गुन्हे दाखल केले होते त्यामुळे सदर डॉक्टरच बोगस असून त्याला नेमके कोणाचे अभय मिळत आहे अशी चर्चा आता परिसरात रंगली आहे.

Previous articleपत्रकार म्हणून आपण व्यक्त  होणार आहोत की नाही – बापुसाहेब गोरे
Next articleपोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई न केल्यास ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा