पत्रकार म्हणून आपण व्यक्त  होणार आहोत की नाही – बापुसाहेब गोरे

अमोल भोसले,पुणे

प्रसार माध्यमांमध्ये काम करणारे आपण नेहमीच अल्प संतुष्ट असतो. त्यामुळे समाज,व्यवस्थापन व सरकार नेहमीच आपणास गृहीत धरत आलेत.आणि हे आपल्या अंगवळणी पडले आहे. महापूर असेल, कोरोना सारखी महामारी असेल अशावेळी पत्रकारांनी जीव धोक्यात घालून चोवीस तास काम करावे ही अपेक्षा सर्वांचीच मात्र ज्यावेळी पत्रकारांना काही देण्याची वेळ येते त्यावेळी सगळेच मागे सरकतात.

मराठी पत्रकार परिषद गेली अनेक वर्षांपासून पत्रकारांच्या हितासाठी कार्यरत असल्याची माहिती महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख बापुसाहेब गोरे यांनी दिली.

पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकारांना पेन्शन यासारख्या प्रश्नासाठी अनेक वर्षे आंदोलने केली. पत्रकारांच्या मागणीसाठी असणारी आंदोलने होत असताना अनेक पत्रकारांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. याउलट आंदोलन करणे हे पत्रकारांचे काम आहे का ? हे परिषदवाले काहीही करतात, पेन्शन आणि पत्रकार हल्ला विरोधी कायदा कुठं होणार आहे का ?अशी सार्वजनिक ठिकाणी मुक्ताफळे उधळणारी आपलीच मंडळी दिसत होती. छोट्या छोट्या आंदोलनाची बातमी करणारे पत्रकार, जेव्हा पत्रकारांच्या मागणीसाठी होणारी राज्यस्तरीय  मोठ-मोठी आंदोलने झाली त्या आंदोलनात सहभागी तर होतच नाही उलट आंदोलनाची चार ओळीची बातमी करताना अनेकांना कमीपणा वाटतो त्यावेळी अश्या महाभागांची “कीव”करावीशी वाटते. आंदोलने झाली, पत्रकारांना पेन्शन सुरू झाली, पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाला त्यामुळे पत्रकारावर हल्ला होण्याचे प्रमाण कमी झाले परंतु हे होत असताना पत्रकार म्हणून आपण “व्यक्त कधी होणार आहोत?”

 जगभर कोरोनाचा उद्रेक होत आहे. महाराष्ट्रात शंभरच्या वर पत्रकार कोरोनाचे शिकार झाले आहेत. ना सरकार लक्ष देत ना माध्यमांचे मालक. अनेक पत्रकारांचे कुटुंब उध्वस्त होत असताना समाज व सरकार ही गप्प आहे. साधी नोंदही घेतली जात नाही अशी गंभीर व निराशाजनक  परिस्थिती असताना “आपण व्यक्त होणारच नाही का?” मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख हे राज्यातील पत्रकारांच्या हितासाठी सतत कार्यरत असतात. पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शन इत्यादी निर्णय हे एस एम देशमुख यांच्या आंदोलनाचे फलित आहे हे कोणीही नाकारू शकत नाही.

 महाराष्ट्रात अनेक पत्रकारांचे कोरोनामुळे निधन होत असल्याने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृत पत्रकारांच्या कुटुंबातील व्यक्तीस महाराष्ट्र सरकार पन्नास लाख रुपये देईल अशी घोषणा केली. मात्र पन्नास लाख रुपये सोडा महाराष्ट्र सरकार मृत पत्रकारांची साधी नोंद ही घेत नाही ही शोकांतिका आहे. त्यामुळेच मराठी पत्रकार परिषदेने एस एम सरांच्या पुढाकाराने पन्नास लाख सोडा कोरोना काळात मृत झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबास पाच लाख रुपये महाराष्ट्र सरकारने अनुदान द्यावे या मागणीसाठी राज्यभर ईमेल पाठवा आंदोलन केले. यावेळी एक हजार ईमेल पाठविले गेले ही संख्या कमी नसली तरी महाराष्ट्रातील पत्रकारांची संख्या लक्षात घेता ही संख्या नक्कीच कमी आहे यावेळीही आपले पत्रकार का व्यक्त झाले नाहीत?. सरकारच्या विरोधात झालेल्या आंदोलनानंतर सरकार जागे होईल अशी आशा होती मात्र याही सरकारने पत्रकारांच्या आंदोलनास पाने पुसली,सरकार कुठले असो पत्रकारांच्या बाबतीत सगळे सारखेच अशी उद्धव ठाकरे सरकार बद्दलची पत्रकारांमध्ये भावना झाली  आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे पत्रकार मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यांच्या कुटुंबाला कसलीच मदत मिळत नाही हे पाहून एस एम देशमुख यांनी मृत पत्रकारांच्या कुटुंबाला सरकार मदत करीत नाही,किमान ज्या व्यवस्थापनाकडे पत्रकार काम करतो त्या व्यस्थापणाने तरी पत्रकारास  मदत म्हणून त्यांचा विमा उतरवावा अश्या प्रकारच्या मागणीची पोस्ट राज्यभर फिरविली.

 ही बाब राज्यातील अनेक वर्तमानपत्राच्या मालकांना रुजली नसली तरी ज्यांच्यासाठी ही पोस्ट राज्यभर पाठविली त्या पत्रकारांना ही रुजलेली दिसत नाही कारण एस एम देशमुख पत्रकारांच्या भल्यासाठी वर्तमानपत्र व माध्यमांच्या मालकांच्या विरोधात जाऊन  मागणी करत असताना त्यांच्या पोस्ट बद्दल महाराष्ट्रातील किती पत्रकार व्यक्त झाले? हे पाहुन महाराष्ट्रातील पत्रकारांना खरंच अडचणी आहेत का? असा प्रश्न पडतो. वर्तमानपत्राच्या मालका विरोधी पगार वाढीबद्दल जाहीर बोलायचे नाही?

कोरोनाचे कारण देऊन अनेकांना घरचा रस्ता दाखविला तरीही बोलायचे नाही? कोरोनामुळे जाहिराती कमी झाल्या त्यामुळे 40% टक्के पगार कमी केला (इतर व्यस्थापणात असे ऐकिवात नाही) तरीही बोलायचे नाही? आता कोरोनाने थैमान घातले असताना ही काम करताना पत्रकार मृत पावतात त्यांचे कुटुंब रस्त्यावर येते तरीही बोलायचे नाही तर बोलणार कधी ?व्यक्त होणार कधी?याचा विचार करण्याची वेळ आली आहे. पत्रकारांच्या भल्यासाठी आंदोलने करावीच लागतील त्या होणाऱ्या आंदोलनामध्ये  पत्रकार म्हणून वावरत असणाऱ्यांनी सहभागी व्हावेच लागेल अन्यथा येणारी पुढची पिढी या नकारात्मक जगणाऱ्या पत्रकारांना दुसने देत राहील एवढे मात्र नक्की.

बापूसाहेब गोरे

प्रमुख-महाराष्ट्र सोशल मीडिया

Previous articleराष्ट्रवादीचे कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १९० साखर कारखान्यांना दिले ऑक्सीजन निर्मितीचे आदेश
Next articleशिक्रापुरात बनावट पद्धतीने सुरु होते कोविड केअर सेंटर