जागतिक पुस्तक दिनानिमित्त समयसूचक वक्ते, शिक्षकनेते धर्मराज पवळे यांचे स्वगत


“माईकवर भाषण देणारे आणि सगळे निवेदक उत्तम वक्ते असतील असं नाही, पण सगळे वक्ते मात्र उत्तम निवेदक व प्रभावी सूत्रसंचालक असू शकतील हे नक्की!”

~ प्र.के.अत्रे.
पुस्तकांच्या मैत्रीतून उत्तम वाचन…
व्याख्याने, सभा, प्रवचनं~किर्तनांमधून सखोल ज्ञानाचं श्रवण…

ऐकलेलं~वाचलेलं यांचं शांत

चिंतन…
यातून जन्माला येतं ह्रदय जिंकणारं प्रभावी समयसूचक

भाषण!

अशी व्यासंगी माणसं ‘निष्णात वक्ता’ म्हणून नावारुपाला यायला वेळ लागत नाही!
आमच्या बालपणी श्रावण महिन्यात गावामध्ये पोथी (अर्थासहीत ग्रंथवाचन) असायचे तेव्हा रामविजय, हरीविजय, नवनाथ, पांडवप्रताप हे ग्रंथ आमच्या पिढीने ऐकले.
(दुर्दैवाने पुढच्या पिढीचे हे सद्भाग्य नसले तरी त्यांना किमान रामायण, महाभारत आदि संस्कृतिवर्धक मालिका टि.व्ही. अथवा युट्युबवर पाहण्याची गोडी लावायलाच हवी किंवा तशा आशयाच्या कादंबर्‍या आवर्जून वाचायला द्यायला हव्यात.
पुढे बंधूराज गुरुवर्य पी.डी.भाऊंच्या संगतीने राजगुरुनगरच्या सार्वजनिक वाचनालयाचा सभासद झाल्यावर शेकडो पुस्तकांशी जडलेली मैत्री, त्याच वाचनवेडातून आपल्याप्रमाणे पुढच्या पिढीला गावातच ज्ञानदालन खुलं व्हावं या भावनेने गावी वाकळवाडीला स्व.पित्याच्या नावाने काढलेले शासनमान्य स्व.रामचंद्र पवळे वाचनालय ज्याचे अध्यक्षस्थान सन्माननीय पी.डी.भाऊ पवळेंकडे सोपवले. आज चार हजार + पुस्तके शिवतीर्थ वाकळवाडीकरांची ज्ञानतृष्णा अहोरात्र शमवताहेत, युवापिढी समृद्ध होतेय याचं मनस्वी समाधान आहे!

प्राचार्य शिवाजीराव भोसले, बाबासाहेब पुरंदरे, अविनाश धर्माधिकारी, ह्रदयनाथ मंगेशकर, बाळासाहेब ठाकरे, आर.आर.पाटील, साहेबराव बुट्टेपाटील, नितीन बानगुडे ……..अशा शेकडो नामवंत वक्त्यांची अनेक व्याख्याने/भाषणे ऐकत ऐकत आमची पिढी ज्ञानसमृद्ध होत गेली.

शालेय वयात एकही भाषण न केलेला लाजराबुजरा पोरगा मी, मात्र या वाचन, श्रवण, चिंतनाच्या बळावर काॅलेज आणि तद्नंतरची सभा~सभागृहे आणि व्यासपीठे गाजवता आली…(अगदी नम्रतेने हं…अहंकाराचा वारा न लागो राजसा गाजवता येताहेत~येतील ती पुस्तकमैत्रीमुळेच हे अतिशय विनम्रपणे नमूद करतो!

खेड तालुक्यापुरतं बोलायचं झालं तर माझ्या अल्प माहितीनुसार वक्तोत्तम ह.भ.प.आसाराम महाराज बढे, भरतमहाराज थोरात, चैतन्यमहाराज वाडेकर, शशिकांत महाराज राऊत, निलम पोतले-वडघुले व अनेक आदरणीय सांप्रदायिक महाराज…
राजकिय नेत्यांमध्ये
शरद बुट्टेपाटील, अंकुश राक्षे, दादासाहेब पानसरे, बापूसाहेब घाटकर, विनोद महाळुंगकर पाटील, साई शिंदे व अनेक नेते- कार्यकर्ते…सुनिल थिगळे, नरेंद्र गायकवाड, सुर्यकांत मुंगसे व सर्वच निवेदकमित्र… संपत गारगोटे, संतोष गाढवे, शुभम घाडगे, मधुकर गिलबिले, संजय राळे, तानाजी महाळुंगकर, क्रांती कराळे, प्रसाद माटे, मनोहर मोहरे, बाबासाहेब गायकवाड, अक्षय कोळेकर आदि अनेक व्याख्याते…सिद्धार्थ चव्हाण, संजय नाईकडे, राजेश बनकर व अनेक अधिकारी…सगळे पत्रकारमित्र…!समस्त साहित्यिक परिवार!

अशी शेकडो नावे जी आपल्या अमोघ वक्तृत्वाने~लेखणीने खेड तालुक्याच्या व्यासपटलावर चमकताहेत त्यामागे या अनेक बाबींबरोबरच ‘पुस्तक’ मैत्री हे एक ठळक कारण आहे!

वाचाल तर वाचाल, ग्रंथ हेच गुरु…..हे सारं म्हणण्यापेक्षा प्रभावी वापर ज्याने केला तो नावारुपाला आला…आणि येत राहील!

या आकस्मिक सुट्टीच्या कालखंडात आम्ही कुटूंबिय दूरदर्शनच्या रामायण, महाभारत मालिका अखंड पाहतोयच आणि त्याच्या जोडीला,चिरंजीव राजवेद, कु.शिवराज्ञी, सौ.विजया आणि मी देखील ‘संभाजी’, ‘श्रीमान योगी’, ‘मृत्यूंजय’, ‘स्वामी’, ‘माझी जन्मठेप’, ‘राधेय’, ‘बलुतं’, ‘समिधा’, ‘समाजसुधारक’…..
हि पुस्तके एकामागे एक वाचून काढतोय. शाळा~काॅलेज सुरु असती तर पोरांना ट्यूशन~अभ्यासातून यासाठी वेळ काढणं अवघड जातं, प्रत्येक क्षण मग तो सुखाचा असो वा दु:खाचा त्याला सकारात्मकतेने सामोरे जायचं…त्याला सजवायचं हि आमची रीत इथंही कामी येतेय!
आपणही आपल्या परिवारासह पुस्तकांच्या प्रेमात पडावं, हि मनस्वी प्रार्थना!

वाचनं हे पेरणं असतं, तर लिहणं म्हणजे उगवणं! उगवण्याची चिंता करीत बसण्यापेक्षा पेरणीला सुरुवात करा, एक दिवस तुमच्या शेतात उगवलेलं धान्य लोक पेरण्यासाठी घेऊन जातील!

जागतिक पुस्तक दिनाच्या आपणां सर्वांना मनोभावे शुभेच्छा!

~ श्री.धर्मराज पवळे.
(मा.अध्यक्ष: खेड तालुका शिक्षक संघ)
‘शिवतीर्थ’ वाकळवाडी/’रामविजय’ राजगुरुनगर.

Previous articleसिद्धेगव्हाणमध्ये लसीकरणास चांगला प्रतिसाद
Next articleराष्ट्रवादीचे कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १९० साखर कारखान्यांना दिले ऑक्सीजन निर्मितीचे आदेश