करोनाचे एक लाखापर्यंतचे बिल जिल्हा परिषद भरणार

अमोल भोसले,उरुळी कांचन –प्रतिनिधी

जिल्हयातील ग्रामीण भागातील कोरोना बाधीत व संशयीत रूग्णांनी नोंदणीकृत खाजगी रुग्यालयात उपचार घेतल्यास डॉ. रखमाबाई राऊत योजने अंतर्गत पुणे जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून अर्थ सहाय्य योजना सुरु करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी, व प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य अधिकारी यांना आपल्या कार्यक्षेत्रातील ज्या कोरोना बाधीत अथवा संशयीत रुग्णांवर नोंदणीकृत खाजगी रुग्यालयात उपचार करण्यात आले असतील अशा रुग्णांचे प्रस्ताव सदरच्या योजनेच्या लाभासाठी विहीत नमुन्यात या कार्यालयास त्वरीत सादर करावेत. असें आदेश एका पत्राद्वारे दिले आहेत. या योजने अंतर्गत कोरोना संशयीत रूग्ण म्हणून उपचार घेतल्यास ५ हजार रुपये, विलगीकरण केलेल्या बाधीतासाठी ५० हजार रुपये, आय सी यू मध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांकरीता ७५ हजार रुपये तर व्हेटीलेटरवर उपचार घेतलेल्या रुग्णांकरीता १ लाख रुपये प्रती रूग्णास १४ दिवसाचे उपचासाठी मिळणार आहेत. उपरोक्त मर्यादेत किंवा रुग्णावर प्रत्यक्षात उपचारासाठी आलेला खर्च यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अर्थ सहाय्य म्हणून देय राहणार आहे. सदर योजनेच्या लाभासाठी लाभार्थी रुग्ण हा पुणे जिल्हयातील ग्रामीण भागातील रहीवासी असावा. त्यानेे ज्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतले असतील ते रुग्णालय बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट अंतर्गत नोंदणीकृत असावे. सदरचा लाभ केवळ कोरोना बाधीत अथवा संशयीत रुग्णावरील उपचारासाठीच देय राहील. सदरचा लाभार्यी महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, धर्मादाय आयुक्तांकडील मदत योजना अथवा इतर कोणत्याही वैयक्तिक लाभाच्या योजनेचा ( वैयक्तिक आरोग्य विमा योजना इ.) लाभधारक नसावा. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या “डॉ. रखमाबाई राऊत योजनेचा” लाभ निश्चितच सर्व सामान्य नागरिकांना होणार असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती अमित कांचन यांनी सांगितले.

Previous articleआंबेगाव तालुक्यात एकाच दिवशी सापडले १० रुग्ण
Next articleजुन्नर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या पोहचली १६७ वर; आज सापडले १९ कोरोणा बाधित रुग्ण