आमदार अतुल बेनके यांच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण

नारायणगाव (किरण वाजगे)
जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या निवासस्थानावर ड्युटी करत असलेल्या सुरक्षारक्षकाला मारहाण करणाऱ्या पाच जणांवर नारायणगाव पोलीस स्थानकात आज (दि. २१) रोजी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवार (दि. २०) एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कपिल वासुदेव कानसकर व अन्य चार जणांनी जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या निवासस्थानामध्ये जबरदस्तीने घुसून व आमदारांना शिवीगाळ करून सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. तसेच सुरक्षारक्षकांचे कपडे फाडून त्याच्या खिशातील रोख रक्कम घेऊन पोबारा केला.या घटनेवरून कपिल वासुदेव कानसकर यासह अज्ञात चार जणांवर नारायणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आमदार बेनके यांचे सुरक्षारक्षक खंडेराव पिराजी पानसरे (वय ३५ वर्ष राहणार अशोका पॅलेस, नारायणगाव) यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून कपिल कानसकर यासह अज्ञात अनोळखी चार जणांवर भारतीय दंड विधान कलम ३९५ नुसार नारायणगाव पोलिस स्थानकात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे करीत आहेत.

दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी आमदार अतुल बेनके व त्यांच्या कुटुंबियांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

Previous articleमळवंडी ठुले लघुपाटबंधारे विभागाच्या मच्छीमारी करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी
Next articleभारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी पिंपरी चिंचवड शहर शहरध्यक्ष राजेंद्र चिंचवडे यांचे वतींने व्यापारी बांधवांचे कोरोना तपासणी शिबिर संपन्न