ट्रॅक्टरच्या अपघातात वडील व मुलाचा मृत्यू

प्रमोद दांगट

ट्रॅक्टरने शेतात काम करत असताना झालेल्या अपघातात वडील आणि मुलाचा मृत्यू झाला. तर ट्रॅक्टरचालकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना शनिवारी (दि. १७) राळेगण (ता. जुन्नर) येथे दुपारी घडली.

सोपान उंडे (वय ५६), तेजस सोपान उंडे (वय २०) असे अपघातात मृत्यू झालेल्या वडील- मुलाचे नाव आहे. तर संदेश तळपे असे जखमी ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, कल्याण (जि. ठाणे) येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सोपान ठंडे सुट्टी घेऊन कुटुंबासह राळेगण येथे आपल्या गावी आले होते. नुकताच पाडव्याच्या दिवशी त्यांनी नवीन ट्रॅक्टर खरेदी केला होता.

शनिवारी दुपारच्या वेळेस सोपान उंडे, त्यांचा मुलगा तेजस आणि घंगाळदरे येथील ट्रॅक्टर चालक तळपे यास घेऊन शेती मशागत करत होते. एका शेतात रोटर मारून झाल्यानंतर दुसऱ्या शेतात जात असताना तीव्र उभी चढण व जागेवरील वळण यामुळे चालकाचे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर थेट २० फूट खोल असलेल्या शेतात पडला. यावेळी ट्रॅक्टरवर बसलेले सोपान उंडे व चालक तळपे ट्रॅकरवरील हुडात अडले. तर तेजस जमिनीवर पडला. गंभीर जखमी झालेल्या तळपे यांनी हुडातुन सुटका करून आरडाओरडा केली. त्याच्या घंगाळदरे गावातील लोकांना फोन करून बोलावले. घंगाळदरे आणि राळेगण येथील लोक मदतीसाठी पोहोचले; मात्र तोपर्यंत सोपान उंडे यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर तेजस आणि तळपे यांना उपचारार्थ दवाखान्यात नेत असताना रस्त्यातच तेजसचाही मृत्यू झाला. तर तळपे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, ट्रॅक्टर हा छोटा असून त्याला जोडलेल्या रोटरच्या वजनामुळे ट्रक्टरचे वळणावर नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील तपास जुन्नर पोलीस करत आहेत.

Previous articleपिंक व्हॉटसअँप मेसेजपासून सावध राहा
Next articleडिवाईन जैन ग्रुप आणि श्री स्वामी समर्थ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नदानाचा उपक्रम