आंबेगाव तालुक्यात एकाच दिवशी सापडले १० रुग्ण

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

आंबेगाव तालुक्यात गुरुवार दि.९ रोजी कोरोना रुग्णांच्या संख्येत दहा ने वाढ झाली असून तालुक्यात आता एकूण कोरोना रुग्णाची संख्या ८३ झाली आहे. गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टमध्ये मंचर येथे ३ रुग्ण, कोलदरे येथे ३ रुग्ण, घोडेगाव येथे १ रुग्ण, लांडेवाडी येथे १ रुग्ण, महाळुंगे पडवळ येथे २ रुग्ण, असे एकूण १० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

लांडेवाडी येथे एक ५१ वर्षीय पुरूष कोरोना पॉझिटिव्ह सापडला असून सदर रुग्ण हा शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा सुरक्षा रक्षक आहे. हा रुग्ण मूळ पुणे येथे वास्तव्यास असून तो आठवड्यातुन एकदा पुणे येथे जात असतो. शिवाजीराव आढळराव पाटील हे गेली ८ दिवस सदर सुरक्षारक्षकांच्या संपर्कात आलेले नाही असे सांगण्यात आले आहे. मात्र खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने आढळराव पाटील यांचे व त्यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी नेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात फिरणाऱ्या आढळरावांना आता किमान रिपोर्ट येईपर्यंत तरी फिरता येणार नाही. तसेच हा सुरक्षा रक्षक अजून कुणाकुणाच्या संपर्कात आला आहे याची माहिती घेण्यात येणार असून त्यांचेही स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

घोडेगाव येथे ४० वर्षीय पुरुष कोरोना बाधित रुग्ण सापडला असून सदर रुग्ण फळांचा व्यवसाय करत आहे. दोन दिवसांपूर्वी सापडलेला कोरोना बाधित रुग्ण घोडेगाव न्यायालयात कर्मचारी म्हणून कार्यरत होता. हा कर्मचारी या फळ विक्रेत्यांकडे नेहमी फळे नेण्यासाठी येत होता. त्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्याने या फळ विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मंचर येथे २६ वर्षीय व,२७ वर्षीय, दोन पुरुष तसेच ३४ वर्षीय महिला असे तीन रुग्ण सापडले आहेत. यातील २ पुरुष रुग्ण हे मंचर मध्ये या अगोदर सापडलेल्या रुग्णांच्या नात्यातील असून त्यांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोना झाल्याचे बोलले जात आहे. तर तिसरा रुग्ण महिला असून तिची दोन दिवसांपूर्वी एका रुग्णालयात प्रसूती झाली होती. मात्र ती कुणाच्या संपर्कात आली हे समजू शकले नाही.

कोलदरे येथे ३२ वर्षीय, ६५ वर्षीय, ३० वर्षीय, असे तीन पुरुष रुग्ण सापडले आहेत. हे तीनही रुग्ण काही दिवसांपूर्वी कोलदरे येथे सापडलेल्या महिला रुग्णाच्या कुटुंबातील आहेत. कोलदरे येथे एकूण चार रुग्ण झाले असून सुरक्षेच्या दृष्टीने काही दिवस गाव बंद ठेवण्यात आले आहे.

महाळुंगे पडवळ येथे सैदवाडी येथे ७० वर्षीय एक महिला व चासकरमळा येथे ५९ वर्षीय एक पुरुष असे दोन रुग्ण सापडले आहेत. येथील पुरुष रुग्ण हा काही दिवसांपूर्वी एका दुःखद व लग्नाच्या कार्यक्रमात सहभागी झाला असल्याचे सांगितले जात आहे. महाळुंगे पडवळ येथे पहिले तीन व हे दोन मिळून पाच रुग्ण झाले आहेत. हे रुग्ण मिळताच रुग्ण मिळालेल्या परिसरात व गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येणार आहे.

आंबेगाव तालुक्यात आज अखेर कोरोना रुग्णांची संख्या ८३ झाली असून त्यातील ४८ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत तर ३२ जण उपचार घेत असून, तीन जण मयत झाले आहेत. अशी माहिती तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली. दरम्यान आंबेगाव तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून मंचर शहर प्रतिबंधक क्षेत्र जाहीर केले आहे. तर इतर गावातही सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत, रुग्ण सापडलेल्या गावात व शहरात विनाकारण गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleमहाळुंगे येथील कोविड सेंटरमध्ये खेड तालुक्यातील रुग्णांसाठी बेड राखीव ठेवण्याची राम गोरे यांची मागणी
Next articleकरोनाचे एक लाखापर्यंतचे बिल जिल्हा परिषद भरणार