उसने पैसे देत नसल्याने वेटरकडून मित्राचा खून

प्रमोद दांगट

मोराची चिंचोली (ता. शिरूर) येथील मैत्री हॉटेलमध्ये उसने पाच हजार रुपये घेण्याच्या वादातून वेटर मित्रानेच वेटर मित्राचा चाकूने गळा कापून निर्घृण खून केला. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश सुखदेव शर्मा (वय ५१ रा कऱ्हाड जि सातारा), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. विठ्ठल केशव मोरे (वय ३५ पानशेवाडी, ता कंधार, जि. नांदेड), असे फरार आरोपीचे नाव आहे. हॉटेल मालक गणेश साहेबराव धुमाळ यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी की मोराची चिंचोली येथे पाबळ रोडलगत गणेश धुमाळ यांच्या मालकीचे मैत्री हॉटेल आहे. त्याठिकाणी मयत शर्मा व आरोपी मोरे हे वेटरचे काम करीत होते. (दि.१) रोजी लॉकडाऊन झाल्यानंतर दोघा वेटरपैकी एकास हॉटेल सोडून जाण्यास सांगितले होते. परंतु आम्ही दोघे जीवलग मित्र असून एकमेकांपासून दूर राहू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे दोघांना धुमाळ यांनी हॉटेलमध्येच राहण्यास सांगितले.

दोन दिवसा पूर्वी हॉटेल मालक हे वेटरला जेवणाचा डबा देण्यासाठी गेले असता मोरे यांनी रमेश शर्मा यास पाच हजार रुपये उसने दिले होते. ही रक्कम देत नाही म्हणून दोघांमध्ये वाद झाला होता. शर्मा हा पाच हजार रुपये परत देण्यास तयार नव्हता. यातून मोरे यांनी शर्मा याचा खून केला. (दि. १९) सकाळी हॉटेल मालक धुमाळ आले असता त्यांना खून झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर आरोपी मोरे हा फरार झाला असून पोलीस त्यांचा कसून तपास करीत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक बिरुदेव काबुगडे, हवालदार राजेंद्र गवारे करीत आहेत.

Previous articleमांडवगण फराटा येथील कोविड सेंटरला पत्रकारांच्या आवाहनातून शिवसेनेकडून ५१ हजारांची मदत
Next articleपिंक व्हॉटसअँप मेसेजपासून सावध राहा