कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रेमडिसिव्हर इंजेक्शनला फेविपॅरावीर व फॅबी फ्लु चांगला पर्याय -खासदार डॉ. अमोल कोल्हे

अमोल भोसले,उरुळी कांचन

रेमडिसिव्हर इंजेक्शन हे शंभर टक्के जीवनरक्षक नाही असे कोविड टास्क फोर्सने यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र रेमडिसिव्हर प्रमाणेच फॅबी फ्लु आणि फेविपॅरावीर औषध कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चांगला पर्याय आहे हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे बाधितांचे नातेवाईक व रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर या दोघांनीही घाबरून न जाता या औषधांचा वापर जास्तीत जास्त करावा असा आवाहन शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कोरोना केअर सेंटरला भेट देऊन पूर्व हवेलीतील कोरोना रुग्ण व आरोग्य विभागाला येणा-या अडचणी जाणून घेतल्या. यानंतर पत्रकारांशी बोलतांना खासदार डॉ. कोल्हे यांनी वरील आवाहन केले. यावेळी हवेलीचे अप्पर तहसिलदार विजयकुमार चोबे, हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव, लोणी काळभोर ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय पवार, कदमवाकवस्तीचे ग्रामविकास अधिकारी प्रविण देसाई, तलाठी दादासाहेब झंजे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकध्यक्ष दिलीप वाल्हेकर उपस्थित होते.

डॉ. कोल्हे म्हणाले की, रूग्णालयातील डॉक्टर व बाधितांचे नातेवाईक यांच्याकडून रेमडिसिव्हर इंजेक्शनची मागणी मोठया प्रमाणित होते आहे. ते उपलब्ध होत नसल्याने सर्वजण हवालदिल झाले आहेत. यामुळे या पुढील काळात रेमडिसिव्हर
इंजेक्शनचा मागणीप्रमाणे पुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. यामुळे डॉक्टरांनी सध्यातरी गरजू रुग्णांनाच हे इंजेक्शन द्यावे.

रेमडिसिव्हर जीवनरक्षक नसले तरी याचा उपयोग शरीरातील विषाणूचा भार कमी होण्यासाठी होतो. यामुळे सध्याची मागणी मोठ्या प्रमाणांत वाढली आहे. इंजेक्शन उपलब्ध झालं नाही तर कोविड टास्क फोर्सने पर्यायी औषध म्हणून फॅबी फ्लु आणि फेविपॅरावीर सुचविले आहे. यामुळे कोरोना रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी रेमडिसिव्हर इंजेक्शन वापराबाबत पुर्ण विचार करण्याची गरज आहे. शासनाने रेमेडेसिविर इंजेक्शन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी युद्दपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र रेमेडेसिविरचा पुरवठा सुरळीत होईपर्यंत कोविड टास्क फोर्सने सुचविलेली औषधे रुग्णांना देण्याची गरज आहे. नागरीकांनीही आरोग्य विभागाला सहकार्य करण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Previous articleग्रामीण भागातील शिवभोजन थाळी केंद्राची संख्या वाढवण्याची मागणी
Next articleउरुळी कांचन परिसरात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर अत्यंत कडक कारवाई केली जाणार-स.पो.नि. दादाराजे पवार