अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – अजित पवार

अमोल भोसले,उरुळी कांचन—प्रतिनिधी

बारामती शहरासह तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

दरम्यान बारामती शहर परिसरात सुरु असणाऱ्या विविध विकास कामांना प्रत्यक्ष भेटी देत अजित पवार यांनी कामाचा आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओहोळ , जेष्ठ नगरसेवक किरण गुजर, जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती संभाजी होळकर उपस्थित होते.

या भेटीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहर ते माळेगाव येथील प्रस्तावित सेवा रस्ता , बारामती नगरपरिषद वाहनतळ, बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, गौतम बाग येथील कॅनलच्या दोन्ही बाजूला वाढविण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या ‘व्हिआयटी हॉल’ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता बारवकर, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर , नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव , तालुका कृषि अधिकारी श्री. पडवळ , सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विकासकामे दर्जेदार झाली पाहिजेत, त्यामध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. विकासकामे करताना रस्त्यांचे सुशोभिकरण करणे, सेवा रस्त्यालगत झाडे लावण्याकडे बारकाईने लक्ष द्यावे. शासकीय जागांमध्ये असणारी अतिक्रमण हटवण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या. तसेच अवैद्य वाळू उपसा तसेच अवैद्य धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही अजित पवार यांनी पोलीस विभागाला दिले. तसेच ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या.

Previous articleप्रिया पवार यांची युवती काँग्रेसच्या मुख्य समन्वयक पदी निवड
Next articleनारायणगाव पोलिस स्टेशन हद्दीमध्ये नियमांचे उल्लंघन करून हॉटेल चालू ठेवणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल