अरूण पाटे यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल

नारायणगाव – येथील शेतकरी अरूण मार्तंड पाटे (वय ५४ रा. नारायणवाडी) यांना गणपती मंडळात झालेल्या वादातून बेदम मारहाण केल्याप्रकरणी १५ ऑगस्ट २०१७ रोजी नारायणगाव पोलिस स्थानकात सहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र या घटनेचे मुख्य सूत्रधार व मुख्य आरोपी असलेले नारायणगावचे सरपंच योगेश नामदेव पाटे, अनिल दादाभाऊ खैरे व सुनील रामदास खैरे या तीन जणांवर त्या वेळी गुन्हा दाखल झाला नव्हता.

 

फिर्यादी अरुण मार्तंड पाटे यांनी जुन्नर न्यायालयामध्ये याबाबत फौजदारी आचारसंहिता कलम १५६/३ प्रमाणे घटना घडल्यानंतर काही दिवसांनी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार जुन्नर न्यायालयाने नारायणगाव चे विद्यमान सरपंच योगेश नामदेव पाटे व अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश नारायणगाव पोलिसांना दिले. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

 

दरम्यान या घटनेमधील सचिन सुरेश नरवडे, संदीप सुरेश नरवडे , सोमनाथ मारुती तोडकरी, विकास शंकर म्हस्के, कमलेश किसन गावडे व सुजित संजय गाडेकर यांच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल झालेला आहे.या सर्व आरोपींवर गुन्हा रजिस्टर नंबर ३९७/२०१७ भा.द.वी. कलम ३२६, ३२५, ३२४, १४३, १४७, १४८, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. फिर्यादी अरूण पाटे यांच्या बाजूने सरकारी वकील एडवोकेट अतुल वर्पे तसेच एडवोकेट कौस्तुभ करपे यांनी काम पाहिले. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे करीत आहेत.

या घटनेमुळे विद्यमान सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे यांच्यावर गेल्या महिन्याभरात हा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी १७ मार्च २०१९ रोजी नारायणगाव येथील शेतकरी अमोल तांबे व त्यांची पत्नी शुभांगी यांना मारहाण केल्याप्रकरणी तसेच चाळकवाडी येथील टोल नाक्यावर काही दिवसांपूर्वी केलेल्या आंदोलनामुळे सरपंच योगेश पाटे यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

Previous articleव्हीलचेअरमुळे चौदा वर्षानंतर स्वतःच्या पायावर उभा राहू शकलो- सुदर्शन जगदाळे
Next articleबीट मार्शल चोवीस तास मदत सेवेचा लोकार्पन सोहळा संपन्न