उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले बाजार शेड बनले दारूड्यांचा अड्डा

वाघोली-पुणे शहराजवळील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखला जाणाऱ्या वाघोली ग्रामपंचायतच्या माध्यमातून अंदाजे सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून वाघोली येथील गट नंबर ११२३ मध्ये वाघेश्वर भाजी मंडई नावाने भाजीपाला विक्रेत्यासाठी भव्य असे पत्रा शेड उभारण्यात आले आहे तर यामध्ये भाजीपाला विक्रेत्यांना बसण्यासाठी सिमेंटचे ओटे देखील तयार करण्यात आले आहे.परंतु कोटी रुपये खर्च करून तयार केलेले हे भाजी मंडई चे शेड उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असून हे शेड आता मात्र दारुड्यांचा अड्डा बनले आहे.या ठिकाणी पाहणी केली असता तेथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य दिसून येत असून शेडमध्ये दारूच्या बाटल्या,गावठी दारूचा फुग्यांच्या पिशव्या पाहायला मिळत आहे तर अनेक दारूडे दिवसभर या शेडमधील कट्ट्यांवर झोपल्याचे ही पाहायला मिळत आहे. याकडे मात्र वाघोली ग्रामपंचायतीचे पूर्ण पणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.एकीकडे वाघोली बाजार मैदानात भर उन्हात विक्रेते भाजीपाला विक्री करताना दिसत आहे तर शेजारीच कोटी रुपये खर्च करून उभारलेले शेड मात्र ग्रामपंचायत आणि स्थानिक पुढाऱ्यांच्या हलगर्जी पणामुळे पडून असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

येत्या काळात लवकरच भाजी मार्केट हे उद्घाटन न करताच भाजीपाला विक्रेते यांना उपलब्ध करून दिले जाईल.

अनिल कुंभार, ग्रामसेवक, वाघोली

या शेड साठी जिल्हाधिकारी यांची परवानगी नसून त्यांनी या बाबतींत चौकशी आदेश दिले आहेत. ग्रामपंचायतच्या माध्यमातून संबधित विभागाची परवानगी न घेता अनेक कामी चालु आहे त्यामुळे अशी वेळ येऊन ग्रांमपंचायतचा नाकर्तेपणा दिसत आहे.

किशोर सातव,सामाजिक कार्यकर्ते, वाघोली

या बाबतीत मला काही माहिती नाही तुम्ही ग्रांमपंचायत किंव्हा बीडीओ शी संपर्क साधा.

सचिन बारवकर,उपविभागीय अधिकारी, हवेली.

लवकरच आमदाराच्या व जेष्ठ नागरिकांच्या हस्ते या भाजीपाला शेड चे उद्घाटन करण्यात येणार आहे.

वसुंधरा उबाळे, सरपंच, वाघोली

जर ह्या बाजार शेडच्या बांधकामासाठी जिल्हाधिकाऱ्यांची कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नसेल तर त्या बाजार शेडच्या कामाची चौकशी जिल्हाधिकारी करणार का ? असा देखील प्रश्न सर्व सामान्य वाघोलीकराना पडला आहे.

Previous articleकोव्हीड सेंटरचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते उदघाटन
Next article सहकारी संस्थाच्या निवडणूकांना पुन्हा ऑगस्ट अखेरपर्यंत स्थगिती