कर्तव्यात कसूर केल्याने पारगाव शिंगवे येथील पोलीस पाटलाला केले निलंबित

प्रमोद दांगट

पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक गावच्या हद्दीत संगम हार्डवेअर ठिकाणी चोरून गुटखा विक्री करत असलेल्या ठिकाणावर पोलिसांनी कारवाई केली होती.ही गुटखा विक्री पारगाव चे पोलीस पाटील शिवाजी ठकाजी लोंढे यांचा मुलगा गणेश शिवाजी लोंढे यानी केली होती. गुटखा विक्री करत असलेले ठिकाण हे पोलीस पाटील शिवाजी ठकाजी लोंढे यांच्या मालकीचे असल्याने त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी असा अहवाल मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्याकडे पाठवला असता या सर्व प्रकरणाची चौकशी करून उपविभागीय दंडाधिकारी यांनी पोलीस पाटील यांना पदावरून निलंबित केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की दि.२९/१/२०२१ रोजी मंचर पोलिसांनी पारगाव शिंगवे हद्दीत संगम हार्डवेअर याठिकाणी गुटखा विक्रीवर कारवाई केली होती या कारवाईत सुमारे 13 हजार 812 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी गणेश शिवाजी लोंढे ( रा. पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक ता.आंबेगाव ) याला अटक करण्यात आली होती.सदर आरोपी हा पारगाव गावचे पोलीस पाटील शिवाजी ठकाजी लोंढे यांचा मुलगा असून जप्त मुद्देमाल हा पोलीस पाटील लोंढे यांच्या मालकीच्या असलेल्या ठिकाणावर सापडल्याने त्यांना पोलीस पाटील पदावरून तात्काळ निलंबित करावे असा अहवाल मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी मा. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्याकडे पाठवला होता.

पो. निरीक्षक यांनी पाठवलेल्या अहवालानुसार या प्रकरणी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी आंबेगाव यांना चौकशी कामी कळवले असता त्यांनी त्यांच्याकडील अहवाल १/३/२०२१ रोजी जिल्हाधिकारी यांना पाठवला होता. याबाबत पोलीस पाटील यांना लेखी व तोंडी म्हणणे मांडण्यास सांगितल्यास त्यांनी त्यांना दोन मुले असून रेशन कार्ड मध्ये नाव एकत्र आहेत परंतु ती त्यांच्या पासून विभक्त राहतात असे नमूद केले होते.

याबाबत उपलब्ध सर्व कागदपत्रे लेखी व तोंडी युक्तिवाद, तसेच पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथील मंडलाधिकारी यांनी दिलेल्या जबाबानुसार पोलीस पाटील यांनी घरातील व्यक्ती गुटखा विक्री करत असतानाही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 चे कलम 9( फ) मधील तरतुदीनुसार कर्तव्य पार पाडण्यात कसूर करून त्याबाबत दुर्लक्ष केले प्रकरणी पोलीस पाटील शिवाजी ठकाजी लोंढे ( रा.पारगाव तर्फे अवसरी बु ता.आंबेगाव पुणे ) यांना सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी जुन्नर आंबेगाव सारंग कोडोलकर यांनी दिला आहे .

Previous articleपारगाव येथे कपड्याच्या दुकानात चोरी ; ४० हजार रुपयांची कपडे चोरीला
Next articleअखिल भारतीय वारकरी मंडळाच्या मावळ तालुका मार्गदर्शकपदी हभप शांताराम ढाकोळ