पुणे-दौंड लोहमार्गावर बहुप्रतिक्षित मेमू धावली

अमोल भोसले,उरुळी कांचन

सुमारे पस्तीस वर्षापासूनची पुणे दौंड मेमू लोकलची मागणी आज झाली पूर्ण .भाजपा व राष्ट्रवादी या पक्षांच्या श्रेय वादाच्या पार्श्वभूमीवर आज उरुळी रेल्वे स्टेशन येथे सर्वसामान्य नागरिकांनी या गाडीचे केलेले स्वागत महत्त्वाचे ठरत आहे. उरुळी कांचन रेल्वे स्टेशन वर प्रवाशांना रेल्वेकडून सुविधा मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या श्रीप्रयागधाम ट्रस्टच्या महात्माजींनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज सकाळी ७.३८ वाजता पुण्याहून दौंड कडे जाणाऱ्या इलेक्ट्रिक लोकल मेमूचे तर ८ वाजता दौंड वरुन पुण्याकडे जाणाऱ्या इलेक्ट्रिक लोकलचे उरुळी स्टेशनवर लोकलच्या चालकांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान करीत स्वागत केले.

याप्रसंगी महात्माजी अनमोल रामानंद, योग रामानंदजी, मनोज बजाज, स्टेशन मॅनेजर एम.एस. माने व मोहन सालोडकर आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. या इलेक्ट्रिक लोकल मेमूच्या दौंड वरुन पुण्याकडे दोन फेऱ्या तर पुण्यावरून दौंड कडे दोन फेऱ्या प्रायोगिक तत्त्वावर आज पासून सुरु करण्यात आलेल्या आहेत, यापूर्वी या मार्गावर १९७६ ते २०१९ या काळात पुणे दौंड शटल सेवा (साधी पॅसेंजर) सुरू करण्यात आली होती.

मात्र प्रवाशांची मागणी असतानाही तांत्रिक अडचणीमुळे इलेक्ट्रिक लोकल मेमू सुरू होत नव्हती म्हणून रेल्वे खात्याने सुमारे अडीच वर्षांपूर्वी डिझेलवर चालणारी लोकल सेवा चालू केली होती. त्या डेमू लोकलच्या फेऱ्या आजपासून बंद करण्यात आल्या आहेत. या डेमूमुळे प्रत्येक स्थानकावर थांबूनही या रेल्वे गाडीचा वेग चांगला असल्यामुळे वेळेची बचत होत होती.त्याच धर्तीवर आजपासून सुरु झालेल्या इलेक्ट्रिक लोकल मेमूमुळे हडपसर, मांजरी, लोणी, उरुळी, यवत, खुटबाव, केडगाव, पाटस व दौंड या भागातील प्रवाशांना दौंड पुणे प्रवास करण्यासाठी कमी वेळ लागणार असून प्रवासात बसण्याच्या जागेचीही उपलब्धता मोठ्या प्रमाणात होणार आहे. भविष्यात प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, या इलेक्ट्रिक लोकल मेमूमुळे डिझेलची व वेळेची बचत होणार असून, पर्यावरणाची हानी टळणार आहे.

Previous articleगुळाणी येथील सटवाजीबाबांचा उत्सव रद्द
Next articleगावठी पिस्तूल व काडतुसासह एक जण जेरबंद