लग्नानंतर सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेली नववधू जेरबंद

प्रमोद दांगट

आंबेगाव तालुक्यातील भराडी येथील तरुणाची खोटे लग्न करून फसवणूक करणाऱ्या तरुणीला व तिच्या साथीदारांना पकडण्यात मंचर पोलिसांना यश आले आहे. या टोळीला पकडण्यासाठी मंचर पोलिसांनी मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये सुमारे ३५०० किमीचा प्रवास करून त्याना अटक केली आहे.यामध्ये आरोपी लग्न जमविणाऱ्यासह , वधू व तिच्या इतर तीन साथीदार असे पाच जणांना मंचर पोलिसांनी अटक केली आहे.तर दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी ( नितीन कुरकुटे (रा.भराडी ता.आंबेगाव ) हे लग्नासाठी मुलगी शोधत असताना त्यांच्या ओळखीतील मध्यस्ती नवनाथ महादेव गवारी ( रा.गवारीमळा ता.आंबेगाव ) याने कुरकुटे यांना शिंगणापूर परभणी येथील लक्ष्मी मच्छिंद्र चव्हाण या मुलीचे स्थळ सुचवले होते. त्यानंतर कुरकुटे यांनी दि.१४ रोजी गवारी यांना मध्यस्थीचे दीड लाख रुपये दिले त्यानंतर मुलीची मावशी , मामा , काळे नावाचा इसम यांनी घाई गडबड करून आम्ही गरीब आहे असे सांगून नवऱ्या मुलाचा विश्वास संपादन करत दि.१५ फेब्रुवारी रोजी भराडी ता.आंबेगाव येथे फिर्यादीच्या राहत्या घरी विवाह केला .त्यानंतर आठ दिवसातच नवरी मुलीने माझी मावशी आजारी आहे असे सांगून अंगावर पाच तोळे दागिने घालून ती फरार झाली. तीचा शोध घेतला असता तिचा शोध न लागल्याने याबाबत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नितीन कुरकुटे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपींवर मंचर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्याच्या तपासकामासाठी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अजित मडके , राजेंद्र हिले, योगेश रोडे, सुनिता बटवाल, शर्मीला होले, वैशाली बिडकर ,रेश्मा गाडगे हे पोलिसांचे पथक रवाना झाले. या पथकाने मराठवाड्यातील नांदेड , लातुर ,परभणी ,धुळे ,बीड या पाच जिल्ह्यांमध्ये सुमारे तीन हजार पाचशे किमीचा प्रवास करून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी लक्ष्मी मच्छिंद्र चव्हाण ( वधु ) ,केशव कुंडलिक काळे ( सिडको.जिल्हा नांदेड ) ,सोनाली केशव काळे ( रा. सिडको ,नांदेड ) , गोविंद ज्ञानोबा मुसकवाड ( रा.उदगीर ,लातूर ) नवनाथ महादेव गवारी (रा.गवारीमळा, मेंगडेवाडी ता. आंबेगाव ) ,या पाच आरोपीना अटक केली आहे. तर कमल नामदेव जाधव (मावशी) , महादेव लक्ष्‍मण चिंचवाड ( मामा ) हे दोन आरोपी अजूनही फरार आहेत.पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजित मडके करत आहेत.

मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी तीन महिन्यापूर्वी मंचर पोलीस ठाण्याचा चार्ज घेतला. तेव्हापासून गोरगरिबांना लुटणाऱ्या , त्यांची फसवणूक करणाऱ्याना व सर्व प्रकारच्या गुन्हेगारांना पो. नि. सुधाकर कोरे यांनी कायद्याचा वचक दाखवून वठणीवर आणले आहे. कोरे यांची तपास यंत्रणा वेग घेत असल्याने मंचर पोलिसांचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.

Previous articleखंबाटकी घाटात ट्रक व चारचाकी मोटार जळून खाक
Next articleआमदार अतुल बेनके यांची तमाशा कलावंतांना पाच लाखांची मदत