राहुरीतील पत्रकार हत्याकांडातील मास्टरमाईंड शोधून काढा एस.एम.देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 अमोल भोसले,पुणे

राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येची चौकशी करून या हत्याकांडातील मास्टरमाईंड शोधून त्यांना कठोर शासन करण्याची मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी एका निवेदनाव्दारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

 येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे काल दुपारी समाजकंटकांनी अपहरण केले. रात्री त्यांचा मृतदेह मिळाला या घटनेबद्दल तीव्र संताप आणि चिंता व्यक्त करून एस.एम.देशमुख यांनी म्हटले आहे की, एका पत्रकाराचे दिवसाढवळ्या अपहरण करून त्याची निर्दयपणे हत्या होते ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाच्छनास्पद आहे. दातीर यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून राहुरी परिसरातील अनेक गैरकृत्य उजेडात आणली होती. लोकांच्या हक्कासाठी लढताना अनेक हितसंबंधी त्यांचे शत्रू झाले होते. दातीर यांच्या  लेखणीमुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले गेले आहेत अशाच धेडांनी त्यांची हत्या घडवून आणली असावी असा अंदाज देशमुख यानी निवेदनात व्यक्त केला आहे. निवेदनाची प्रत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहराज्य मंत्री शंभुराजे देसाई यांनाही पाठविण्यात आली आहे.

निवेदनावर मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी पुणे विभागीय सचिव बापुसाहेब गोरे आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Previous articleनारायणगाव येथील वाईन शॉप चालकावर गुन्हा दाखल
Next articleपवनानगर येथे सामाजिक कार्यकर्ते मंगेश कालेकर यांच्या वतीने ५ हजार मास्क’चे वाटप