स्कॉटीश कड्यावर फडकावला तिरंगा

राजगुरूनगर- सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी अति कठीण श्रेणीत गणला जाणारा ५५० फूट उंची असलेला स्कॉटीश कडा सर करीत डॉ.समीर भिसे, अक्षय भोगाडे, सचिन पुरी, संदीप राऊत, सचिन पारसकर, भाग्येश जधव, रवी कुंभार आणि प्रियांका जढार या गिर्यारोहकांनी अभिमानाने तिरंगा फडकाविला आणि “भारत माता की जय” या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

नाशिक जिल्ह्यातील हरिहर गडावरील (३६७६ फूट) ८० अंशातील कातळ पायऱ्यांचा थरार अनुभवण्याकरिता अनेक जण येथे आवर्जून येतात परंतु याही पेक्षा रोमांचक थरार देणारा स्कॉटीश कडा हा साहसी गिर्यारोहकांचे आकर्षणाचे ठिकाण. स्कॉटीश कडा ही हरिहर गडाची ५५० फूट उंच असलेली उभी भिंतच. अनुभवी गिर्यारोहकांचीही परीक्षा घेणारी ही मोहीम. डग स्कॉट या ब्रिटिश गिर्यारोहकांनी हा कडा १९८६ साली पहिल्यांदा सर केला होता.

यामुळेच या कड्याचे नाव स्कॉटीश कडा असे आहे.
ही मोहीम हर्शेवाडी (ता. त्रिंबक जि. नाशिक) येथून सुरु झाली. २ तासांची पायपीट करून कड्याच्या पायथ्याशी पोहोचून पूजा करून शिवगर्जना देत अरोहणाची सुरवात झाली तर आरोहणासाठी ४ तास लागले.
स्कॉटीश कडा सर करायला मानसिक आणि शारीरिक कणखरता लागते. खडकांच्या खाचांमध्ये हातांच्या आणि पायाच्या बोटाची मजबूत पकड करून आरोहण करावे लागते.
पहिला ७० फूटी टप्पा पार करीत अजून ७० फूटी टप्पा पार केल्यावर बहिर्गोल खडक अरोहण करणे कठीण जाते.

या दुसऱ्या टप्प्या नंतर दोन खडकाळ भिंतीतून चिकाटीने १०० फूट आरोहण करून तिसरा टप्पा येतो तर पुढचा ९० फूटी चौथा टप्पा ही खडकाच्या अरुंद भिंतीमधून सर करणे जणू गिर्यारोहकांचे शारीरिक आणि मानसिक परीक्षा घेणारेच आहे. तरीदेखील ३८ डिग्री अंश सेल्सियसच्या तापमानात आणि निसटणा-या खडकापासून योग्य प्रकारे सुरक्षितता घेत पॉईंट ब्रेक ऍडव्हेंचर्स च्या चेतन शिंदे, जॅकी साळुंखे, चेतन बेंडकोळी, दर्शन वडजे, अजय बोंबले, राहुल काळे, गणेश राऊत, ऋषी पोखर्ना,सौरव भगत आणि अर्चना गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.समीर भिसे, अक्षय भोगाडे, सचिन पुरी, संदीप राऊत, सचिन पारसकर, भाग्येश जधव, रवी कुंभार आणि प्रियांका जढार या गिर्यारोहकांनी कडा सर करीत अभिमानाने तिरंगा फडकाविला.

गिर्यारोहकांनी स्कॉटीश कडा सर करीत छ्त्तीसगढ येथे नक्षलवादी हल्ल्यत देशासाठी वीरमरण आलेल्या शहिद जवानांना श्रद्धांजली वाहून केलेली ही साहसी मोहीम कोविड योद्धा यांना समर्पित केली.

Previous articleपिंपरी’बु”मध्ये पहिल्याच दिवशी ३४७ नागरिकांचे लसीकरण
Next articleभारतीय पत्रकार संघाच्या दाैंड तालुकाध्यक्षपदी सुभाष कदम यांची निवड