विहिरीत पडलेल्या बिबट्याचे वाचवले प्राण ; वनविभागाच्या प्रयत्नांना यश

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यातील नगदवाडी येथील स्मशानभूमीजवळील सुखदेव विठोबा जगताप यांच्या शेतातील विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात वन विभाग व रेस्क्यू टीमच्या सदस्यांना यश मिळाले आहे.रविवारी दि. ४ रोजी रात्री बिबट्या विहिरीत पडला होता.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सोमवारी दि.५ रोजी सकाळी विहिरीतून वन्य प्राण्याचा आवाज येत होता म्हणून विहिरीमध्ये जगताप यांनी पाहिले असता त्यांना विहिरी मध्ये बिबट्या पडल्याचे दृष्टीपथात आले. त्यांनी ताबडतोब वनविभागाशी संपर्क साधला.

दरम्यान जगताप यांच्या विहिरीला कठडा नसून भक्ष्याचा पाठलाग करत असताना हा बिबट्या विहिरीत पडला असावा. वनविभाग व बिबट रेस्क्यू टीमने तातडीने येऊन दुपारी १ वाजता या बिबट्याला सुखरूप बाहेर काढले. बिबट्या मादी असून ती सर्वसाधारणपणे ७ ते ८ वर्षे वयाची पूर्ण वाढ झालेली आहे. नगदवाडी,कांदळी, वडगाव कांदळी या परिसरामध्ये नागरिकांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असते. हा बिबट्या विहिरीतून सुखरुप बाहेर काढून पुढील वैद्यकीय उपचारासाठी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात नेला आहे. या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वनपाल सचिन मोढवे, वनरक्षक अरुण देशमुख, कैलास भालेराव, वनसेवक नाथा भोर, बाळू वामन, किसन गुळवे व रेस्क्यू टीमचे सदस्य अजिंक्य भालेराव यांनी परिश्रम घेऊन बिबट्याला सुखरूप बाहेर काढले.

Previous articleमहाळुंगे – बिरदवडी रस्त्यावरील विजेचा खांब वाकला ; वीज कंपनीचे दुर्लक्ष
Next articleराज्यातील तरुणाईला रा.यु.कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांची रक्तदानासाठी हाक