चाळकवाडी टोल नाक्यावर माजी आमदार शरद सोनवणे यांच्यासह आंदोलनकर्त्यांकडून संचारबदीचे उल्लंघन

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी पुणे नाशिक महामार्गावर असलेला चाळकवाडी येथील टोलनाका गुरुवार  ( दि .१ ) रोजी मध्यरात्री बंद केला. टोल प्रशासनाने आमचे प्रश्न मार्गी लावावेत मगच टोलनाका सुरु करावा अशी ठाम भूमिका माजी आमदार सोनवणे यांनी घेतली.

दरम्यान कोरोना संसर्ग वाढत असताना शासनाने रात्री आठ नंतर संचारबंदी लागू केली आहे अशा परिस्थितीत टोलबंद आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई होणार का असा सवाल सर्वसामान्य नागरिकांनी केला आहे.

चाळकवाडी टोलनाका १५ जुलै २०१८ पासून  बंद असून हा टोलनाका राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने गुरूवारी ( दि १ एप्रिल) मध्यरात्री बारा वाजता सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पुणे नाशिक महामार्गाची अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. तसेच काही शेतकऱ्यांच्या जमीनींच्या भूसंपादनाची राहिलेली नुकसानभरपाई प्रथम मिळावी. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गात गेल्या आहेत त्यांच्या मुलांना नोकरी द्यावी तसेच जुन्नर तालुक्यातील स्थानिक नागरिकांना टोलमधून मुक्तता मिळावी. या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल सुरु होऊ देणार नाही. अशी भूमिका माजी आमदार सोनवणे यांनी घेतली.

यावेळी त्यांच्यासमवेत जुन्नर बाजार समितीचे  माजी संचालक व ज्येष्ठ शिवसैनिक आनंद रासकर, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे,  पिंपळवंडीचे उपसरपंच प्रदीप चाळक, अनिल खैरे, आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर पवार व टोल प्लाझाचे प्रशासकीय अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले.

दरम्यान जुन्नर चे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी देखील टोल सुरु करण्यास विरोध केला असून त्यांच्या वतीनेही टोल प्रशासनाला टोल बंद करण्याबाबतचे लेखी निवेदन त्यांचे  बंधू अमित बेनके, अजित लेंडे यांच्या मार्फत दिले.याबाबत आपण स्वतः व शिरुरचे खासदार डाॅ अमोल कोल्हे  जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व पोलिस प्रशासन यांच्याशी चर्चा करून टोल बाबत पुढील निर्णय घेऊ असे या निवेदनात आमदार अतुल बेनके यांनी म्हटले आहे.

Previous articleसामाजिक कार्यकर्ते गौतमराव खरात यांच्या वाढदिवसानिमित्त किशोर वाघमारे यांनी लिहिलेला हृदयस्पर्शी लेख
Next articleवयोवृद्ध व्यक्तींनी लसीकरण करुन घ्यावे- माजी सभापती सुजाता पवार