निगडाळे ते भिमाशंकर सात कोटी २६ लाख रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामाचा चुराडा

सिताराम काळे

– श्री क्षेत्र भीमाशंकर ते निगडाळे हया वन्यजिव विभागाच्या हद्दीत असलेले चालू असलेले सिमेंट रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या मनमानी कारभारामुळे अत्यंत निकृष्ट पध्दतीने होत असुन या ७ कोटी २६ लाख रूपयांच्या कामाचा चुराडा होत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर हे पुणे जिल्हयामध्ये असलेले एकमेव ज्योर्तिलींग आहे. याठिकाणी देशाच्या कानाकोप-यातून लाखो भाविक पवित्र शिवलींगाचे दर्षन घेण्यासाठी येत आहे. तसेच या ठिकाणी कांेढवळ धबधबा, मुंबई पॉईट, गुप्त भिमाशंकर, हनुमान तळे, नागफणी, अभयारण्य असल्याने पर्यटकांचीही गर्दी असते. श्री क्षेत्र भिमाशंकरकडे जात असताना निगडाळे ते भीमाशंकर या चार ते पाच कि. मी. अंतर असलेल्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असुन यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच हा रस्ता अरूंद असल्याने भाविकांची मोठया प्रमाणात गैरसोय होत होती. हा रस्ता भिमाशंकर अभयारण्यात येत असल्याने वन्यजिव विभागाचे अधिकारी कित्येक वर्षे येथे काम करून देत नाही. त्यामुळे राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी वन्यजिव विभागाच्या अधिका-यांची वारंवार बैठका घेवून काही अटी व शर्तीवर हा रस्ता दुरूस्त करण्यास परवानगी मिळवली. महाशिवरात्रीनंतर या रस्त्याचे भुमिपुजनही करण्यात आले.

 

परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या कृपाशिर्वादामुळे व ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे हे काम अत्यंत निकृष्ट पध्दतीने केले जात आहे. या रस्त्यादरम्यान काही ठिकाणी कठडे बांधण्यात आले असुन हे कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. कठडे तयार झाल्यापासुन त्यावर कधी पाणीही मारले जात नसल्याचे दिसुन येते. सिमेंट रस्ता सलग तयार न करता दोन कामांचे मध्ये सुमारे ४०० मिटरचे अंतर ठेवून काम केले जात आहे. जुना असलेला डांबरी रस्त्याला क्रॅच न करता त्यावरच खडी, कच व काही प्रमाणात सिमेंट मिक्स करून पाणी न वापरता सुके मटरिअल पसरविल्यानंतर त्यावरून रोडरोलर फिरवला जातो. या कामावरती सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही अधिकारी उपस्थित राहत नाही. संबंधित अधिकारी फक्त आठवडयातील दोन दिवस सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय घोडेगाव येथे येतात व तिथुनच परत पुणे येथे निघुन जातात. ज्यावेळी तालुक्यात लोकप्रतिनिधीं, राजकीय नेते यांचा दौरा असतो त्यावेळी त्यांचे पुढेपुढे करताना संबंधित अधिकारी दिसुन येत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहे. या रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश पठाडे म्हणाले संबंधित कामाची चौकशी करून सांगतो.

Previous articleलोणी येथे बेकायदा ताडी विक्री करणार्‍यावर मंचर पोलिसांची कारवाई
Next articleनारायणगावच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पुष्पाताई आहेर यांची बिनविरोध निवड