यापुढील काळात लोणीकंद पोलिस ठाण्यातील कामकाजात राजकीय हस्तक्षेप व मिलीभगत चालणार नाही – पोलिस उपायुक्त पंकज देशमुख

गणेश सातव, वाघोली

लोणीकंद पोलिस ठाणे पुणे शहर पोलिस आयुक्तालयाशी जोडले गेल्यानंतर प्रथमचं वाघोली येथील वाघेश्वर मंगल कार्यालयात परिसरातील विविध गावांचे लोकप्रतिनिधी,प्रतिष्ठित नागरिक,सामाजिक कार्यकर्ते,हौसिंग सोसायटी व व्यापारी यांच्या स्मार्ट पोलिसींगबाबतच्या विविध सुचना व त्याचबरोबर उपस्थित प्रतिनिधींना मार्गदर्शन करण्यासाठी पोलिसदलाच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी पुणे शहर पोलिस दलाचे परिमंडळ ४ चे उपायुक्त पंकज देशमुख,सहाय्यक पोलिस आयुक्त किशोर जाधव,आमदार अँड अशोक पवार हे उपस्थित होते.

पंकज देशमुख आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, लोणीकंद पोलिस ठाणे शहर पोलिस दलात समाविष्ट झाल्याबरोबर कालचं पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त रविंद्र शिसवे यांच्यासह मी व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोणीकंद पोलिस ठाण्याला भेट दिली.ग्रामीण पोलिस दलाच्या नियंत्रण कक्षाशी जोडला जाणारा १०० नंबर कॉल आता पुणे आयुक्त कार्यालयाशी जोडला जाणार आहे. परिसरातील वाहतूक समस्या नियंत्रणासाठी सध्या शहर पोलिस दलाकडून १० कर्मचारी व एक अधिकारी दिला जाणार असून पोलिस ठाण्यातही नव्याने ४ पोलिस उपनिरीक्षक व १५ कर्मचारी वर्गाची संख्या वाढविण्यात आली आहे. परिसरातील कायदा व सुव्यवस्था बाधित राहण्यासाठी पुढील काळात अत्यावश्यकता असेल तिथे पोलिस चौकी उभारण्यात येणार आहे.येणाऱ्या काही महिन्यात वाघोली हे स्वतंत्र पोलिस स्टेशन होईल. पेट्रोलिंगची आवश्यकता आहे तिथे-तिथे पेट्रोलिंग सुरु करण्यात येईल.त्याचबरोबर महामार्ग, हमरस्ता व गर्दीच्या ठिकाणी C.C.T.V कँमेरे बसवण्यात येईल.या आधीच्या सवयीप्रमाणे पोलिस ठाण्याच्या कामकाजात राजकीय हस्तक्षेप व मिलीभगत चालणार नाही.सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून पोलिस ठाण्याचे कामकाज होईल. गुंडगिरी, माफीयाराज मुळासकट उखडून काढणार तसेच कोणी मिलीजूलीचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर योग्य कायद्याने कारवाई करण्यात येईल.

यावेळी आमदार अँड अशोक पवार यांनीही आपले विचार मांडले.

यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त किशोर जाधव,पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, वाघोली सरपंच वसुंधरा उबाळे,जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद,माजी सदस्य चंद्रकांत कोलते,रामदास दाभाडे,अर्चना कटके,हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास उंद्रे,वाघोलीचे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील,सेवानिवृत्त पोलिस अधिकारी जान मोहम्मद पठाण,सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव भोंडवे, चंद्रकांत वारघडे,कृष्णकांत सातव यांच्यासह परिसरातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

“लोणीकंद पोलिस ठाणे पुणे शहर पोलिस आयुक्तालयात समाविष्ट करण्यात आले आहे.आता परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना सेवा देण्यासाठी पोलीसांना समोर  खालील आव्हाने आहेत”.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे,वाहतूक समस्या सोडवणे,वाढती गुन्हेगारी व वाढते अवैद्य, बेकायदेशीर धंद्यांवर अंकुश ठेवणे,वाढते नागरिकीकरण,विभक्त कुटुंब पध्दतीमुळे वाढते कौटुंबिक हिंसाचार,गोडाऊन भागात मोठ्या कंटेनर गाड्यांचे महामार्गालगतचं पार्किंग,
शैक्षणिक संस्था परिसरात सतत होणाऱ्या
छेडाछेडी व भुरट्या चोरीमुळे पोलिसींग वाढवणे,पोलिस कर्मचारी वसाहतीची निर्मिती करणे,पोलिसांवरील वाढत्या कामाचा ताण कमी करण्यासाठी कर्मचारी संख्या वाढवणे,परिसरात वाघोलीसह मोठ्या लोकसंख्येच्या गावात पोलिस स्टेशनची निर्मिती करणे,परिसरातील संवेदनशील भागात C.C.T.V कँमेरे बसवणे,परिसरातील तिर्थक्षेत्र,धार्मिक क्षेत्र,पर्यटनक्षेत्र भागात पोलिसींग व बंदोबस्त वाढवणे,ग्रामीण भागातील भावकी,गावकीच्या भांडणाबाबत योग्य निर्णय घेणे,वाघोलीसह ग्रामीण भागातील बांधकाम कामगार, गोडाऊन कामगार व उस गु-हाळांवर काम करणाऱ्या परराज्यातील कामगारांची पुन:नोंद करणे.

Previous articleनगरसेवक सुदामभाऊ शेवकरी यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रं १३ मधील विविध कामांचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
Next articleदिशा स्पोर्टस् च्या वतीने पीएसआयपदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव