परवानगीनंतरही भीमाशंकर मंदिर परिसरात शुकशुकाट

सिताराम काळे-राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमिवर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर उघडण्यास काही अटींसह परवानगी दिली. मात्र राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने देवदर्शनासाठी भाविकांची संख्या कमी होवून मंदिर परीसरामध्ये शुकशुकाट दिसुन येत आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात पवित्र शिवलींगाच्या दर्शनासाठी नेहमी भाविक, पर्यटकांची गर्दी असते. याशिवाय भीमाशंकर अभयारण्यातील नागफणी पॉईंट, गुप्त भीमाशंकर, हनुमान तळे, मुंबई पॉईंट, कोंढवळ धबधबा, गोहे पाझर तलाव, डिंभे धरण, आहुपे आदि पर्यटनस्थळांवर देखील नागरिक, पर्यावरण प्रेमी भेट देतात. मंदिरा परीसरातील बेल-फुल, माळ, रूद्राक्ष, डोलीवाले, वनस्पती औषधे, खेळणी, हॉटेल, लॉज आदि ४५० व्यवसाय येथे आपला चरितार्थ चालवितात. परंतु मागील एक वर्षापासुन कोरोनामुळे येथील व्यवसायावर गदा आली. नुकतेच ऑक्टोंबर महिन्याच्या सुमारास हॉटेल, लॉज आदि चालू करण्यास व मंदिर उघडण्यास राज्य शासनाने काही नियम व अटींसह परवानगी दिली. सर्व सुरळीत चालू असतानाच पुन्हा कोरोना विषाणुने थैमान घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे भाविक, पर्यटकांची संख्या कमी होवून येथिल परीस्थिती जैसे थे अशीच झाली आहे.

दरवर्षी या ठिकाणी देवदर्शन व पर्यटनासाठी मुंबई, पुण्यासह इतर राज्यांतून देखील लाखो भाविक पवित्र शिवलींगाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यातुन येथील व्यावसायिकांचे अर्थाजन चालते. परंतु सध्या राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भाविक व पर्यटकांनी भीमाशंकरकडे पाठ फिरवल्याने याचा व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला असुन सर्व व्यवहार बहुतांशी ठप्पच झाले आहे.

Previous articleलोणीकंद पोलीस ठाण्याचा कारभार आता पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत
Next articleआंबेगाव तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत शंभर दिवस कामाचे अभियानाला चांगला प्रतिसाद-गटविकास अधिकारी जालींदर पठारे