कमान येथील प्राथमिक शिक्षकाच्या तत्परतेने वाकळवाडीत चार फूटी नागराजाला जीवदान

राजगुरूनगर-वाकळवाडी (ता. खेड ) येथील एका घरात नागराजाने ठाण मांडले आणि घरातील सर्वांचे धाबे दणाणले.या पूर्ण वाढ झालेल्या चार फूट लांबीच्या नागराजाला पाहण्यासाठी थोड्याच वेळात शे – सव्वाशे लोकांनी गर्दी केली.

आपला रुबाबदार फणा उभारून तो नागराज मात्र सगळीकडे सावध नजर टाकीत होता.त्याच्या चपळ व वेगवान हालचालींवर मात्र सर्व जण लक्ष ठेवून होते.
याला मारण्याची देखील कोणाचीही हिंमत होत नव्हती.
याच कुटुंबात गुंडाळवाडी प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेली व बालवयातच आपल्या शिक्षकांकडून पर्यावरण शिक्षणाचे धडे गिरवलेली पल्लवी भोर सध्याचे नाव (सौ.पल्लवी सुरेश पवळे) नावाची मुलगी विवाहानंतर गृहिणी म्हणून राहते.या मुलीने आपले पर्यावरण प्रेमी शिक्षक संजय नाईकरे यांना तात्काळ फोनवरुन आपल्या घरात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची व प्रसंगाची कल्पना दिली.त्यांनी देखील तितक्याच तत्परतेने लगोलग आपल्या खेड तालुका सर्पमित्र समूहाच्या सदस्या व सर्पमित्र प्रिया थोरात यांना कळविले व संबंधित ठिकाणाची माहिती दिली.सुमारे अर्ध्या तासाच्या आत या सर्पमित्रांनी येथे पोहोचून या नागराजाला शिताफीने पकडले व निर्जन ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले.

खेड तालुक्यातील पर्यावरण संवर्धनात सहभाग घेणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.ही समाधानाची बाब आहे. विशेषतः सर्पमित्र म्हणून समाजोपयोगी कार्य करणा-या सर्व संबंधिताना वनविभाग व शासकीय यंत्रणेने उचित प्रोत्साहन दिले पाहिजे.

अशी अपेक्षा पर्यावरण संवर्धनात वीस वर्षाहून अधिक काळ कार्य करणारे व पर्यावरणाचे अभ्यासक
संजय नाईकरे यांनी व्यक्त केली आहे.खेड तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशुतोष शेंडगे यांनी ही सर्व संबंधितांचे अभिनंदन केले आहे

Previous articleदावडीत जोरदार वादळामुळे घरांचे,पिकांचे नुकसान
Next articleजेजुरी येथील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस; पुणे ग्रामीण LCB शाखेची कामगिरी