केंद्र सरकारने साखर कारखान्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेणे ही काळाची गरज – वळसे पाटील

 प्रमोद दांगट

सन २०-२१ गाळप हंगामात साखर उत्पादन अधिक असूनही केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे साखरेला उठाव नाही. साखर गोडावूनमध्ये पडून असल्याने साखर कारखानदारी अडचणीत आहे. केंद्र सरकारने साखर कारखान्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे कामगार व राज्य उत्पादन शुल्क, मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची सन २०१९-२० आर्थिक वर्षाची २४ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड १९ या संसर्गजन्य आजाराचे पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून शनिवार दि. २० मार्च २०२१ रोजी कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे संस्थापक संचालक कामगार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांचा अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली.

सभेची सुरवात आंबेगाव तालुक्याचे मा.आमदार सहकार महर्षी स्व. दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन व दिवंगतांना श्रध्दाजंली अर्पण करून झाली.यावेळी अहवाल व विषयपत्रिका वाचन कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी केले.

यावेळी प्रास्ताविक व स्वागत करताना चेअरमन बेंडे म्हणाले कि, मागील वर्ष कोरोनाच्या संकटामुळे अतिशय अडचणीत गेले. परंतु त्यातूनही मार्ग काढून कारखान्याने सामाजिक बांधिलकी जपली असून ऊस तोड मजुरांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करून त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्याचे काम केले आहे. याशिवाय शेतक-यांसाठी ठिबक सिंचन, रोपवाटिका, बायोकंपोस्ट असे विविध प्रकल्प राबवून शेतक-यांचे हीत साधले आहे. याशिवाय ऊस उत्पादक शेतक-यांना नेहमीच चांगला ऊस दर देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

मंत्री वळसे पाटील म्हणाले कि, चालू गळीत हंगामात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर यशस्वीपणे कारखान्याने विस्तारीकरण केल्यामुळे दररोज साडेसहा हजार मे.टन ऊसाचे गाळप होत असून ९ लाख ५० हजार मे.टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. कोव्हिड आजाराचे उपाययोजनासाठी जेथे सरकार कमी पडेल तेथे कारखाना व तालुक्यातील सहकारी संस्थांमार्फत मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लवकरच डिस्टीलरी प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार असून त्यापासून अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. त्यामधून ऊस उत्पादकांना नेहमीच चांगला दर देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच भाग विकास निधीमधुनही आवश्यक ती मदत करण्यात येते. सभासद, ऊस उत्पादक, हितचिंतक व कामगार या सर्वांच्या सहकार्यामुळे कारखाना प्रगती करीत आहे. सन २०१९-२० हंगामासाठी नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांचा देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना व वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी बु., यांचा मध्य विभागातील उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार प्राप्त झाला आहे आतापर्यंत कारखान्याला २२ पुरस्कार मिळाले असून हे तुम्हा – आम्हा सर्वांचे यश आहे.

यावेळी पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष मा. विष्णू हिंगे, जिल्हा परिषद समाज कल्याणचे माजी सभापती मा. सुभाष मोरमारे, पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव भालेराव, सखाराम घोडेकर, आनंदराव शिंदे, माजी उपसभापती नंदकुमार सोनावले, यशवंत वाहतूक संस्थेचे अध्यक्ष गणपतराव इंदोरे, शरद सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष सूर्यकांत थोरात, कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग सैद, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे अधिकारी हजर होते. सर्वांचे आभार कारखान्याचे व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर गावडे यांनी मानले.

Previous articleभीमाशंकर कारखान्याच्या ८ लाख १ हजार १११ व्या पोत्याचे पुजन
Next articleदावडीत जोरदार वादळामुळे घरांचे,पिकांचे नुकसान