वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांना गुणवत्तापुर्ण सेवेसाठीचे राष्ट्रपती पोलीस मेडल

कनेरसर (ता.खेड) येथील रहिवासी व पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. खेड तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.

रविंद्र दौंडकर यांचे वडील स्वर्गीय .ह.भ.प.रंगनाथ बाबा दौंडकर हे वारकरी संप्रदायात कार्यरत होते त्यामुळे संस्काराची शिदोरी बालपणीच मिळाली. पदवी घेतल्यानंतर रविंद्र दौंडकर हे लोकसेवा आयोगाची परिक्षा महाराष्ट्रात ५०व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.पोलीस उपनिरीक्षकपदी त्यांची निवड झाली.नाशिक येथे खडतर प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशन गोवंडी येथे १९९६ साली सेवेत रूजू झाले.आजतागायत मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात त्यांनी कर्तव्य बजावले आहे .

रविंद्र दौंडकर यांनी पोलीस खात्यातील उत्कृष्ट अधिकारी म्हणून नावलौकिक मिळविला आहे. पोलीस सेवेत असताना कायद्याचे सखोल ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने त्यांनी एल.एल.बी व एल.एल.एम या पदव्याही संपादन केल्या आहेत.
कनेरसर गावातील अनेक धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान असते.पोलीस खात्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ४००पेक्षा जास्त बक्षीसे व प्रशंसापत्रासहित रोख रक्कम रू.3लाखपेक्षा जास्त मिळाली आहे. रविंद्र दौंडकर यांनी अनेक गंभीर गुन्हे आपल्या कौशल्यपूर्ण तपासामुळे उघडकीस आणले आहेत. त्यामुळे तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या हस्ते बेस्ट डिटेक्शन ऑफीसर म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता. मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील संवेदनशील अशा विविध पोलीस स्टेशनमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. २००८ साली सहाय्यक पोलीस निरीक्षक व २०१३ साली पोलीस निरीक्षकपदी त्यांची पदोन्नती झाले.ठाणे येथे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे प्रमुख म्हणून कार्यरत असताना बांगलादेश वा इतर देशांतून मुंबई येथे होत असलेला अनैतिक बाबींचा व्यापार याबाबत कठोरपणे कारवाई केली .आपल्या आजपर्यंतच्या कार्यकाळात रविंद्र दौंडकर यांनी अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. कर्तव्य कठोर, परंतु समाजासाठी तळमळ व्यक्त करणारे दौंडकर हे सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच सहभागी होतात.

कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने मुंबईतून लोक मोठ्या संख्येने बाहेरगावी जात होते.रविंद्र दौंडकर तेव्हा वाशी पोलीस स्टेशनला होते. त्यांनी लोकांसाठी बिस्किटे, फळे,खाद्यपदार्थ याचे वाटप वरिष्ठ अधिकारी यांच्या सहकार्याने केले.सॅनिटायजर, मास्क,प्रतिबंधक गोळ्या याचे वितरण पोलीस कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय तसेच व्यावसायिक, नोकरवर्ग यांना केले.रविंद्र दौंडकर यांनाही कोरोनाने गाठले ,त्यावर मात करून पुन्हा कर्तव्यावर रूजू झाले.
गेली सहा महिन्यापासून पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणून जबाबदारी पाहत असताना कोरोना संकटकाळात सर्वतोपरीने नागरिंकामध्ये जनजागृती करून सामाजिक बांधिलकी जोपासत आहे.
रविंद्र दौंडकर यांच्या कार्याची दखल वेळोवेळी सामाजिक संस्थांबरोबरच पोलीस खाते व शासनानेही घेतली आहे. १मे २०१८ रोजी त्यांना पोलीस खात्यातील मानाचे “महासंचालक पदक “मिळाले आहे.

पोलीस खात्यामध्ये राष्ट्रपती पदक हा सर्वोच्च सन्मान आहे.रविंद्र दौंडकर यांना २६जानेवारी २०२१ रोजी गुणवत्तापुर्ण सेवेसाठीचे राष्ट्रपती पोलीस मेडल मिळाल्याचे जाहीर झाले व त्यांच्या सेवाकार्याला उचित असा बहुमान मिळाला.
रविंद्र दौंडकर हे खेड तालुक्यातील रहिवासी असल्याने त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे .

Previous articleखा.डॉ.अमोल कोल्हे यांना प्राईम पॉइंट फाउंडेशनचा संसद रत्न पुरस्कार प्रदान
Next articleशरद पवारांना शेकापचे कार्यकर्ते भाई मोहन गुंड यांचे मार्मिक पत्र