अण्णासाहेब मगर बँकेच्या तीन सभासदांची हकालपट्टी

भोसरी- अण्णासाहेब मगर बँकेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने शुक्रवार (दि. १९) रोजी पार पडली. या सभेमध्ये शासन निर्णयानुसार कोविड २०१९ बाबतच्या सुचनांचे काटेकोर पालन करण्यात आले. झालेल्या वार्षिक सभेत विषयपत्रिकेतील सर्व विषय सर्वानुमते मंजुर झाले. त्यानंतर बँकेचे अध्यक्ष प्रा. राजेश सस्ते यांनी संबंधीत सभासदांच्या हकालपट्टीचा विषय सभासदांसमोर मंजुरी साठी सादर केला.

या सभेमध्ये बँकेच्या व पदाधिकाऱ्यांच्या विरुध्द वारंवार तक्रारी करणारे सभासद मल्हारी उर्फ बाळासाहेब गव्हाणे, कुशाभाऊ गव्हाणे व राहूल गव्हाणे यांची सभासदत्वातून हकालपट्टी करण्याचा ठराव ९५ % मताधिक्याने मंजुर करण्यात आला. बँकेच्या विरुध्द सातत्याने तक्रारी करून सभासद व ठेवीदारांध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करून बँकेच्या प्रगतीमध्ये मोठा अडसर निर्माण करत होते. त्यामुळे काही सभासदांच्या मागणीवरुन संचालक मंडळाने त्यांचे हकालपट्टीचा निर्णय घेतला. हा विषय वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुमताने पारीत झाला.

ही सर्वसाधारण सभा बँकेने ऑनलाईन पध्दतीने आयोजित केलेली होती. सभा घेणेबाबत पिंपरी चिंचवड मनपाची तसेच पोलीस आयुक्त कार्यालयाची रितसर परवानगी घेण्यात आली होती. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये बँकेचे अध्यक्ष प्रा. राजेश सस्ते यांनी बँकेची आर्थिक स्थिती सक्षम असलेबाबतची आकडेवारी त्यांनी सभेस सादर केली. सुरुवातीस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गणसंख्येअभावी सभा तहकुब केल्याचे जाहीर केले. त्यानंतर बँकेचे जेष्ठ संचालक अॅड. घनशाम खलाटे यांनी सभेचे अध्यक्षपद बँकेचे अध्यक्ष प्रा. राजेश सस्ते यांनी स्विकारावे असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावास संचालक गणेश पवळे यांनी अनुमोदन दिले. प्रा . राजेश सस्ते यांनी सभेचे अध्यक्षपद स्विकारलेनंतर प्रथमतः स्व. अण्णासाहेब मगर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिप प्रज्वलन करण्यात आलेनंतर सभेच्या प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सभेसमोर एकएक विषय मंजुरीसाठी मांडला. त्यावर सर्व सहभागी सभासदांनी मान्यता दर्शविली.

यावेळी उपाध्यक्ष मनोज बोरसे, संचालक अॅड. घनशाम खलाटे, सुलोचना भोवरे, गणेश पवळे, विजय गवारे, सौ. सोनल लांडगे, दिपक डोळस, अॅड. बाळासाहेब थोपटे, सीए अमेय दर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते. उपाध्यक्ष मनोज बोरसे यांनी ऑनलाईन पध्दतीने सहभागी झालेल्या सर्व सभासदांचे व ऑलाईन यंत्रणा कार्यान्वीत करणारे सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले व सभा संपल्याचे जाहीर केले.

Previous articleप्रत्येकाने चिमण्यांच्या संवर्धनासाठी योगदान देण्याची गरज-डॉ. मोहन वाघ
Next articleदौंड मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांच्या कडक सूचना