महिला शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी नारायणगावचे सरपंच योगेश पाटे या़ंच्याविरोधात गुन्हा दाखल

नारायणगाव – बेकायदा उसाच्या शेतात जेसीबी घेऊन रस्ता तयार करण्याच्या बहाण्याने महिलेसह शेतकऱ्यांना मारहाण करून ऊस पिकाचे नुकसान करणाऱ्या नारायणगावच्या विद्यमान सरपंचासह एकूण चार जणांवर नारायणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती ठाणे अंमलदार पोलीस नाईक भीमा लोंढे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि २२ फेब्रुवारी २०२१ रोजी नारायणगाव चे विद्यमान सरपंच व त्यांचे साथीदार फिर्यादी शुभांगी अमोल तांबे (राहणार तांबेमळा, नारायणगाव) यांच्या शेतामध्ये रस्ता बनविण्याच्या बहाण्याने आले.

यावेळी फिर्यादीचे पती अमोल तांबे व त्यांच्या घरातील वयस्कर व्यक्तींनी सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितले की, तुम्ही बेकायदा आमच्या शेतात घुसू नका. तुम्हाला रस्ता जर बनवायचा असेल तर माझ्या हद्दीतून चार फूट व शेजारच्या शेतकऱ्यांच्या शेतातून चार फूट असा सामायिक रस्ता करावा व याबाबत तुमच्याकडे तहसीलदार किंवा न्यायालयाचा आदेश आहे का असे म्हणून त्यांना बेकायदा रस्ता बनवण्यात मज्जाव केला. यावेळी सरपंच योगेश पाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला धक्काबुक्की केली व माझ्या बरोबर लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. अशी फिर्याद शुभांगी अमोल तांबे यांनी दिली.

नारायणगाव पोलीस स्थानकात बुधवार दिनांक १७ मार्च २०२१ रोजी दुपारी तक्रारदार फिर्यादी शुभांगी अमोल तांबे यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार नारायणगाव चे विद्यमान सरपंच योगेश नामदेव पाटे, ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, आकाश वासुदेव कानसकर, निवृत्‍ती रामचंद्र तांबे (सर्व राहणार नारायणगाव, ता. जुन्नर) यांच्यावर भा.द.वि. कलम ३२३, ४२७, ५०४, ५०६, ३४ यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.घटनेचा पुढील तपास नारायणगाव पोलिस करीत आहेत.

दरम्यान या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ शूटिंग म्हणजेच छायाचित्रण करण्यात आले असून यामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने सरपंच योगेश पाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिला भगिनींशी असभ्य वर्तन केल्याचे दिसून येत आहे.

Previous articleखेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा ऑनलाइन होणार
Next articleपवनाधरणाच्या जागेवर अतिक्रमण ; पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्याचे दुर्लक्ष