आकस्मित मृत्यूची नोंद झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांनी घातपाताची व्यक्त केली शक्‍यता

शिक्रापुर : वाघोली-भावडी रोडवरील एका खाणीमध्ये काम करीत असताना पोकलँडचा धक्का लागून मृत्यमुखी पडलेल्या ऑपरेटरबरोबर घातपात झाला असल्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त करीत याप्रकरणी पोकलँड मालक व दुसरा पोकलँड ऑपरेटर विरोधात संशय व्यक्त करून मृत्यूचा तपास करावा अशी तक्रार लोणीकंद पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार,वाघोली- सुयोगनगर येथील परशुराम मदन जाधव (वय, २६) हा तरुण पोकलँड ऑपरेटर म्हणून काम करत होता. सोमवारी (दि.१५) सकाळी पाण्याची बाटली पोकलँडच्या बकेटमध्ये थंड करण्यासाठी वाकला असता त्याचा पाय लिवरला लागल्याने बकेट खाली आली त्यामुळे केबिन आणि बुम सिलेंडर मध्ये दबून गंभीर जखमी झाली असल्याची खबर लोणीकंद पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. परशुराम जाधव याला उपचारासाठी लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या मृत्युनंतर नातेवाईकांनी घातपाताची शक्यता व्यक्त करून दुसरा पोकलँड ऑपरेटर शरीफ कुतुब शेख (रा. कोरेगाव भीमा) व मालक उमेश बळीराम बन्सल (अग्रवाल) यांनी घातपात घडवून आणल्याचा संशय घेतला आहे.

परशुराम जाधव याच्या मृत्यू बाबत लोणीकंद पोलिसांनी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद देखील केली होती.मात्र, मयत इसमाच्या नातेवाइकांना ह्या घटनेत घातपात असल्याचा संशय आल्याने त्यांनी शविच्छेदनानंतर मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याअगोदर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर त्यांची तक्रार पोलिसांनी न घेतल्याने नातेवाईक संतापले होते.यावेळी मयताच्या नातेवाइकांनी फोन वरून “गरिबाला न्याय द्या’ अशी मागणी थेट पोलिस अधिक्षक डाॕ. अभिनव देशमुख यांना केली.

यावेळी देशमुख यांनी सर्व हकीकत ऐकूण घेत लोणिकंद पोलिसांना गुन्हा दाखल करुन घेऊन तपास करण्याच्या सुचना दिल्या.त्या नंतर पोलिसांनी मयत व्यक्तींच्या नातेवाइकांचे जबाब नोंदवून घेत या प्रकरणी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले. यावेळेस नातेवाईकांचा राग शांत झाला आणि त्या मयत व्यक्तीचा रात्री उशिरा अंत विधी करण्यात आला.

परशुराम जाधव याच्या पश्चात आई आणि पत्नी आहे. त्याची पत्नी गर्भवती असून १६ मार्चला लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार होते. लग्नाच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत पुढील तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी डाॕ.सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर हे करत आहेत.

संबंधित मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी फोन करून सविस्तर माहिती दिल्यानंतर पोलिसांना याबाबत रितसर तक्रार दाखल करून घेऊन योग्य तो तपास करण्याच्या सूचना दिल्या.

डॉ.अभिनव देशमुख( पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक)

Previous articleघोडेगाव ग्रामपंचायतीमध्ये खोटे, मनमानी ठराव, ग्रामपंचायत सदस्यांची लेखी तक्रार
Next articleखासदार डॉ अमोल कोल्हे यांना प्राईम पॉइंट फाउंडेशनचा संसदरत्न पुरस्कार जाहीर