घोडेगाव ग्रामपंचायतीमध्ये खोटे, मनमानी ठराव, ग्रामपंचायत सदस्यांची लेखी तक्रार

Ad 1

सिताराम काळे-आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव ग्रामपंचायत मध्ये खोटे मनमानी ठराव झाले असुन अजुनही असेच मनमानी व गैरकारभार होत असल्याची लेखी तक्रार घोडेगाव ग्रामपंचायत मधील नऊ सदस्यांनी दि. २७ जुलै २०२० रोजी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे देऊन सुध्दा आजपर्यंत यावर कोणतीही कारवाई न झाल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

घोडेगाव ग्रामंपचायत मध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचे १५ सदस्य, शिवसेना पुरस्कृत पॅनेलचे २ सदस्य अशी एकंदरीत १७ सदस्य संख्या आहे. व एक लोकनियुक्त सरपंच आहे. घोडेगाव येथील खाटीक वस्ती क्रमांक दोन कामबाबत व नियमबाहय ठरावाबाबत ग्रामपंचायत मधील नऊ सदस्यांनी लेखी तक्रार अर्ज केला, यामध्ये खाटीक वस्ती क्रॉंक्रिटीकरण काम झाल्यावर या कामाबाबत अनेक तक्रारअर्ज व उपोषणही झाले. तसेच या कामाची पाहणी केली असता संबंधित काम निकृष्ट दर्जाचे झाले असुन रस्त्यावर खड्डे पडले आहेत. याबाबत २९ जुन २०२० रोजी झालेल्या मासिक मिटींग मध्ये सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी या कामासंबंधी ठेकेदारास बिल अदा करणेबाबत कोणताही निर्णय, ठराव किंवा चर्चा देखील झाली नाही. तरी मासिक सभा प्रोसिडींग मध्ये याकामाचे बिल अदा करण्यासंबंधी बेकायदा व मनमानी ठराव करून तो खोटा ठराव सदस्यांची फसवणूक करून समाविष्ट केला.

तसेच विषय क्रमांक ८ ठराव नंबर १ व २ संभाव्य खर्चास मंजुरी देण्याबाबत व विषय क्रमांक १० ठराव क्रमांक ३३ मुद्रांक शुल्क अनुदान मधुन करावयाच्या कामांबाबत देखील कोणतीही चर्चा अथवा ठराव झाला नसुन त्यास सदस्यांची नामंजुरी असल्याचे तक्रार अर्जात नमुद केले आहे. याबाबतची तक्रार करून आठ महिने झाले अदयापपर्यंत यावर कोणतीही कारवाई न झाल्याने सदस्य नाराजी व्यक्त करत आहे.