उंब्रज येथील घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दखल माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

नारायणगाव  (किरण वाजगे)

पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा अपमान सहन न झालेल्या ओतूर येथील अनुजा शिंगोटे या शेतकरी महिलेच्या आत्महत्येची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कोल्हापूर परिमंडळाचे पोलीस महानिरीक्षक सुहास वरके यांना सखोल चौकशीचे आदेश दिल्याची माहिती शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

माजी खासदार आढळराव पाटील हे म्हणाले की, जुन्नर तालुक्यातील उंब्रज परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. येथे राहणारे शेतकरी रोहिदास शिंगोटे हे पत्नी अनुजा शिंगोटे  यांच्या समवेत शेती करण्यासाठी शेतात जात असताना नाकाबंदीवर असलेले ओतूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी नरशिंगे व श्रीमती भोर यांनी दारूच्या नशेत शेतकरी दांम्पत्याला अमानुष मारहाण केली. अनुजा शिंगोटे या शेतकरी महिलेला हा अपमान सहन न झाल्याने व पोलिसांनी पतीला बेदम मारहाण सुरूच ठेवल्याने घटनास्थळी गाडीतील पीक फवारणीचे औषध प्राशन केले. मात्र तरीदेखील या पोलिसांनी शिवीगाळ व मारहाण सुरूच ठेवली. त्यामुळे सदर महिलेच्या पतीनेही हे विषारी औषध प्राशन केले. या घटनेत सदर महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला तर तिच्या पतीची प्रकृतीही अतिशय गंभीर आहे.

हा सर्व दुर्देवी प्रकार मी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कानावर घातला असून त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कोल्हापूर परिमंडळाचे पोलीस महानिरीक्षक सुहास वरके यांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर स्वतःहुन मला दूरध्वनी करून या शेतकरी कुटुंबाला योग्य न्याय देण्याबरोबरच शासनाकडून योग्य आर्थिक मोबदला देण्यात येईल असे सांगून आश्वस्थ केल्याचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना शेतीच्या कामांमध्ये शासनाने मुभा दिलेली आहे. पोलिसांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करताना नागरिकांना घृणास्पद मारहाण करणे अपेक्षित नाही. मात्र दुर्देवाने पुणे जिल्ह्यात कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या नावाखाली अनेक ठिकाणी नागरिकांना बेदम मारहाण केली जात आहे. आंबेगाव तालुक्यात थापलिंग घाटामध्ये तरुण व तरुणीस अमानुष मारहाण पोलिसांनी केली होती. नारायणगावमधील कोल्हेमळा येथील वाहनचालकाला पोलिसांनी केलेल्या मारहाणीत हात फ्रॅक्चर झाला होता. गावडेवाडी येथील तरुणाला बेदम मारहाण होऊन मानेवर काठी मारल्याने तरुण बेशुद्ध झाला होता. या सर्व घटना मी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना यापूर्वीच सांगितल्या आहेत. मात्र दोषी पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध कुठलीच कारवाई न केल्याने निर्दोष लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. शिवसेनेकडून यापुढे असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत.
उंब्रज येथील शेतकरी दांम्पत्याला पोलिसांकडून झालेल्या मारहाण व आत्महत्येप्रकरणी स्वतः मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी लक्ष घातले असून यामधील दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना कडक शासन होऊन पिडीत कुटुंबाला न्याय मिळेल असा विश्वास यावेळी माजी खासदार आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.

Previous articleकोरोना बाधित राजकीय नेत्यांच्या संपर्कात आल्याने खासदार डॉ.अमोल कोल्हे स्वतःहून झाले होम क्वारंटाईन
Next articleखासदार डॉ अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके दोघेही झाले कोरंटाइन