खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश ; कतार येथे गेलेले ४९ जण सुखरूप आले घरी

प्रमोद दांगट,पुणे – शॉर्ट टर्म व्हिसावर कतार येथे गेलेल्या महाराष्ट्रातील ४९ जणांना परत येण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेले प्रयत्न यशस्वी झाले असून आज हे सर्व ४९ जण दोहा (कतार) येथून मुंबईत दाखल झाले.

सुनील गावडे, योगेश नाळे, अक्षय पवार, अंकुश जाधव यांच्यासह ४९ जण कंपनीच्या कामासाठी शॉर्ट टर्म व्हिसावर दोहा, कतार येथे गेले होते. त्यांचे काम संपवून ते परतण्याच्या तयारीत असतानाच कोविड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि जगभरातील विमानसेवा बंद झाल्या. त्यामुळे गेल्या ३ महिन्यांपासून हे सर्वजण दोहा येथे अडकून पडले होते. भारतातील लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत विशेष फ्लाईट्स सुरू झाल्यापासून हे सर्वजण परत येण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होते. मात्र पुरेशा प्रमाणात विशेषतः महाराष्ट्रात येण्यासाठी फ्लाईट उपलब्ध नसल्याने हे सर्वजण अडचणीत सापडले होते. त्याच्यापैकी सुनील गावडे व योगेश नाळे यांनी खासदार डॉ. कोल्हे यांना ई-मेल पाठवून मदतीची विनंती केली.

खासदार डॉ. कोल्हे यांनी तत्काळ दखल घेऊन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र पाठवून या सर्वांना ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत शेड्युल करण्यात आलेल्या ७ जुलै रोजीच्या फ्लाईटमध्ये सीट्स उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार हे सर्वजण आज मुंबईत दाखल झाले. या सर्वांना मुंबईतील ब्ल्यु एक्झिक्यटिव्ह हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

मुंबईत उतरताच श्री. गावडे आणि श्री. नाळे यांनी लगेचच मेसेज करून आपण पोहोचल्याची माहिती दिली. तसेच डॉ. कोल्हे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

Previous articleस्थानिक प्रशासन व ग्रामस्थांची साथ,भोसे गावची कोरोनावर मात तरीही काळजी घ्यावी-पोलीस पाटील सुनिल ओव्हाळ पाटील
Next articleकोरोना बाधित राजकीय नेत्यांच्या संपर्कात आल्याने खासदार डॉ.अमोल कोल्हे स्वतःहून झाले होम क्वारंटाईन