खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न

Ad 1

राजगुरूनगर- खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षिक सभा संस्थाध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील यांच्या अध्यक्षतेखाली (दि. १० रोजी) संपन्न झाली. करोनाचे नियम पाळून आयोजित करण्यात आलेल्या सभेत सभासदांनी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा केली.

संस्थेच्या वार्षिक अहवालाचे व मागील विशेष सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताचे वाचन उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर यांनी केले. उपस्थित सभासदांनी त्यास एकमताने मंजुरी दिली.
काळानुरूप संस्थेच्या ध्येयधोरणात बदल करणे गरजेचे असल्याने काही मुद्यांच्या बाबतीत घटनादुरुस्ती करण्याचा निर्णय मागील विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता, त्यासही सभासदांनी  एकमताने पाठिंबा दिला.
विषयपत्रिकेनुसार झालेल्या चर्चेत हरिभाऊशेठ सांडभोर,  हिरामण सातकर, सतीश नाईकरे, काळूराम कड आदि सभासदांनी सहभाग घेतला.

संस्थेने नवीन सुरू केलेल्या साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयासाठी दळणवळाची सहजता आणि विद्यार्थिनींची सुरक्षितता लक्षात घेऊन राजगुरूनगरपासून जवळपास असलेली महामार्गनजीक अशी योग्य जागा शोधण्यासाठी संस्थेच्या सभासदांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन  अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी केले.

संस्थेचे संभासद असलेले विनायक घुमटकर यांची खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल तसेच दत्तात्रेय ढोरे यांची भांबुरवाडीचे सरपंच म्हणून आणि शांताराम मेदनकर यांची सतत ३० वर्षे मेदनकरवाडी ग्रामपंचायतीत निवडून आल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.

संस्थेच्या विविध शैक्षणिक शाखांचे प्रतिनिधी म्हणून प्राचार्य डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, डॉ. एच. एम. जरे, मुख्याध्यापक श्री. डी. एस. धुमाळ आणि प्रबंधक कैलास पाचारणे यांनी कामकाजात सहभाग घेतला. संस्थेच्या वार्षिक सभेचे आयोजन सुरूवातीस दि. २६ फेब्रुवारी रोजी होणार होते.

मात्र करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदी लागू करण्यात आल्याने संबंधित विभागाची परवानगी घेऊन या सभेचे आयोजन दि. १० मार्च रोजी करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित सभासदांना मुखपट्टी आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.या सभेचे प्रास्ताविक व स्वागत संस्थाध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी केले तर आभार संचालक अंकुश कोळेकर यांनी मानले.