विद्यार्थिनींनी शिक्षणातून आत्मनिर्भर व्हावे : प्रा. नीता डोंगरे

राजगुरूनगर- उच्च शिक्षणाची संधी मिळालेल्या विद्यार्थिनींनी प्रामाणिकपणे शिकावं ,  आत्मनिर्भर व्हावं आणि आत्मसन्मानाने जीवन जगण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. नीता डोंगरे यांनी केले. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विभागाने आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनानिमित्तच्या कार्यक्रमात ‘उत्सव स्त्रीत्वाचा’ या विषयावर बोलत होते. याप्रसंगी प्राचार्यडॉ. व्ही. डी. कुलकर्णी ,  उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे, डॉ. बाळासाहेब अनुसे उपस्थित होते.

प्रा. डोंगरे पुढे म्हणाल्या की, जागतिक महिला दिन हा स्त्रीत्वाचा उत्सव असून महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्रीसन्मानतेच्या दृष्टीने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या निमित्ताने  विद्यार्थिनींनी शिक्षणातून स्वतःची क्षमता ओळखणे, त्या क्षमतांना न्याय देणे आणि भौतिक गोष्टीत अडकून न पडता वैचारिक प्रगल्भता जोपासणे गरजेचे आहे. आरोग्य, शिक्षण, संस्कार व स्वावलंबन या चतु:सूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी स्वतःला स्वयंपूर्ण करावे आणि स्वतःचे प्राधान्यक्रम  निश्चित  करून आपापल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त मराठी विभागाने  स्त्री – जाणिवांच्या कवितांचा काव्यजागर,  महिला दिन हवा कशाला ? या विषयावर परिसंवाद, उंच माझा झोका या विषयावर विद्यार्थिनी मनोगते तसेच महिला दिनानिमित्त शुभेच्छा संदेशाची स्पर्धा असे विविध उपक्रम आयोजित केले.

या उपक्रमांत प्रतीक्षा खराडे, मंगल भदाणे, मयुरी साकोरेे , निता गुरव, अश्विनी लडके, ऋतुजा मांडेकर, स्वाती सावंत इ. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपले विचार मांडले. अर्थशास्त्र विभागाच्या वतीने महिलांचे आर्थिक सशक्तीकरण या विषयायावर उपक्रम राबविण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय शिंदे यांनी तर आभार डॉ. बाळासाहेब अनुसे यांनी मानले.

Previous articleजागतिक महिला दिन कुंजीरवाडी येथे साजरा
Next articleजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खेड पोलिस स्टेशन व महिला सुरक्षा समितीच्या वतीने कर्तुत्ववान महिलांचा सन्मान