अप्पर तहसीलदार हवेली कार्यालयासाठी स्वतंत्र आधिकारी व कर्मचाऱ्यांची आमदार अशोक पवार यांची मागणी

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

हवेलीतील चार मंडलाधिकारी कार्यक्षेत्रासाठी अप्पर तहसिलदार विजयकुमार चोबे यांची नियुक्ती ०९ फेब्रुवारीला पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने केली आहे. त्यामुळे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालयाचे मार्गक्रमण ख-या अर्थाने प्रशासन पातळीवर सुरु झाले आहे. हवेलीतील पुर्व भागासाठी असलेल्या तहसील कार्यालयाच्या कार्यालयीन जागेसाठी वाघोलीतील शासकीय जागा निश्चित होणार असल्याचे याबाबत बोलले जात आहे.

हवेलीत महसूली कामांमध्ये दिरंगाई जास्त असल्याने “झिरो पेडंन्सी” हा शब्द महसूल अधिकारी व कर्मचारी विसरुन गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात, त्यातच कामाची आवक जावक भरपूर असल्याने वेळेवर कामे होत नसलेबाबतच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने होत आहेत. पुर्व हवेलीतील नागरिकांना हवेली तहसिल कार्यालय, खडकमाळ आळी, शुक्रवार पेठ, पुणे येथे येण्याकरीता वाहतुक कोंडीच्या समस्येचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने पुर्व भागातच कार्यालयीन इमारत झालेस येथील शेतक-यांची सोय होणार आहे.

यापुर्वीच हवेलीतील तहसील कार्यालयाच्या हद्दीतील ३० गावे अप्पर तहसील पिंपरी चिंचवडला जोडली असून अद्यापही १३० गावांचा महसूली कारभार हवेली तहसील कार्यालयातून चालवला जात आहे. १३० गावांसाठी तालुक्यामध्ये ४६ तलाठी सजा असून यावर ८ मंडलाधिकारी आहेत. त्यामुळे काही तलाठ्यांकडे अतिरिक्त गावांतील कार्यभाराचा बोजा कायम असल्याने दोन्ही सजांमधील कामकाज पाहताना प्रलंबित कामकाजावरुन त्यांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे.

हवेली तहसीलच्या कार्यक्षेत्रात तब्बल १३० महसूली गावे असून कार्यालयात फक्त ५ अव्वल कारकून, १३ महसूल सहाय्यक व तीन नायब तहसीलदार असून एकूणच पुर्ण तालुक्याची महसूलची जबाबदारी त्यांच्यावर आहे. हवेलीतील तहसील कार्यालयातील तुटपुंज्या कर्मचाऱ्यांच्या कार्यविवरणावर दोन तहसीलदार अवलंबून राहिल्याने कामकाजातील प्रकरणाचा निपटारा होणेस विलंब होत आहे.

पुर्व भागातील खातेदार शेतक-यांची व नागरिकांची अडचण लक्षात घेऊन आमदार अशोक पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय व स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी यांचे मागणीचा पाठपुरावा सुरू केला असून त्याबाबतचे पत्र दिले आहे. वाघोलीतील शासकीय गट न. ११२३ हा १४ हेक्टर २५ आर असुन या पैकी ८० आर या जागेमध्ये नवीन अप्पर तहसिल कार्यालय होणेबाबत तेथील ग्रामस्थांनी व नागरीकांनी विनंती केल्याचे कळवले आहे.