सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

प्रमोद दांगट,मंचर

घोडेगाव ( ता.आंबेगाव ) येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरला दमदाटी व शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अवसरी खुर्द (ता. आंबेगाव ) येथील शेखर विलास चव्हाण (वय २९) याच्यावर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची फिर्याद डॉक्टर राहुल मुरलीधर जोशी यांनी दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की शेखर चव्हाण हा (दि.२८) रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घोडेगाव ग्रामीण रुग्णालय येथे त्याला मारहाण झाल्याप्रकरणी उपचार घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी डॉक्टर जोशी यांनी त्याला त्याची जखम पाहून त्याच्यावर टाके घालावे लागतील असे सांगितले तेव्हा त्याने टाके घालन्यास नकार दिल्याने डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला औषधे लिहून देत त्याला पुढील उपचारासाठी हाडाचे तज्ञ डॉक्टरांचा सल्ला दिला व त्याच्यासोबत जखमांचे मेडिकल सर्टिफिकेट दिले. त्यानंतर शेखर चव्हाण हा सोमवार (दि.१) रोजी पुन्हा दुपारी बारा वाजता डॉक्टर जोशी यांच्या केबिनमध्ये परवानगी न घेता घुसला व डॉक्टर मला म्हणाला काल दिलेल्या सर्टिफिकेट मध्ये माझा डावा हात फ्रॅक्चर झाला आहे असे नमूद करून द्या त्यावेळी डॉक्टर मी असे कृत्य करू शकत नाही तुम्ही हाडांचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जाऊन उपचार घेऊन तसे सर्टिफिकेट घ्या असे म्हणाले त्यावेळी शेखर चव्हाण याने तू मला ओळखत नाही का ? मी इथला भाई आहे तू कसा इथे राहतो तुझ्याकडे पाहून घेतो हे हॉस्पिटल फोडून टाकतो असे म्हणून डॉक्टरला शिवीगाळ व दमदाटी केली आहे. यावेळी इतर कर्मचाऱ्यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कुणाचेही ऐकून घेतले नाही त्यावेळी डॉक्टरांनी मी पोलिसांना कळवतो असे म्हटल्यानंतर तो तेथून निघून गेला. याबाबत डॉक्टर राहुल जोशी यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Previous articleमंचर भीमाशंकर रोडवर तिहेरी अपघात, एकाचा मृत्यू
Next articleजारकरवाडी येथे उसाचा रसाचे मशीन व किराणा साहित्याची चोरी