नारायणगाव वारूळवाडी परिसर कंटेनमेंट झोन जाहीर झाल्यामुळे सर्व व्यवहार बंद ;विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई – स.पो.निरीक्षक अर्जुन घोडे पाटील

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव व परिसरामध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नारायणगाव परिसर हा प्रशासनाने कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. यामुळे पुढील सूचना येईपर्यंत नारायणगाव व वारूळवाडी येथील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील व सरपंच योगेश पाटे यांनी दिली.

दरम्‍यान बँका, पतसंस्था, फायनान्स कंपन्या, अत्यावश्यक सेवा देखील प्रशासनाच्या पुढील सूचना येईपर्यंत बंद राहणार असल्याचे ग्रामपंचायत ने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांमध्ये मास्क न वापरता तसेच विनाकारण टू व्हीलर वर डबलसीट फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. अनेकांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन न करता दुकानांमध्ये गर्दी केल्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे असताना नागरिक व व्यापारी ऐकत नसल्यामुळे अशा लोकांवर आणखी कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा घोडे पाटील यांनी दिला आहे.

याबाबत बोलताना वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ म्हणाल्या की, पुण्यामध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून रुग्णांना ऍडमिट करण्यासाठी बेडची देखील कमतरता जाणवत आहे. त्यामुळे आपल्या गावातील लोकांवर ही वेळ येऊ नये म्हणून विनाकारण घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन डॉ गुंजाळ यांनी केले आहे.

दरम्यान नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांनी देखील ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.यापुढे विनाकारण घराच्या बाहेर पडू नये. प्रत्येकाने सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे व सर्वांनी मास्क वापरावे असे आवाहन देखील सरपंच योगेश पाटे यांनी केले आहे.
दरम्यान नारायणगाव येथील अत्यावश्यक सेवा सुरू असून व्यापारी उत्स्फूर्तपणे अत्यावश्यक सेवा घरपोच देणार असल्याचेही सचिन शेलोत, स्वप्निल भन्साळी, योगेश गुगळे, किशोर पोखरणा, महेश वालझाडे, अविनाश शिंदे आदी व्यापाऱ्यांनी सांगितले.

Previous articleशिक्षकांला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करा ; जुन्नर न्यायालयाचे आदेश
Next articleसोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासून महाळुंगे पोलीस चौकीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा पोलीस पाटलांनी वाढदिवस केला जल्लोषात साजरा