कोरेगाव भीमा ते वढु बु. रस्त्याच्या कामाला साडेसहा कोटींची प्रशासकीय मंजुरी

अमोल भोसले,उरुळी कांचन

वढु बु. येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक बलिदान स्थळाचे महत्त्व लक्षात घेऊन कोरेगाव भीमा ते वढु बु. प्रजिमा १९ या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांच्या मागणीनुसार ‘पीएमआरडीए’ने साडेसहा कोटींच्या कामाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी मालिकेनंतर वढु बु. येथील बलिदान स्थळाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या शंभुभक्तांच्या संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा ते वढु बु. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्याचे मजबुतीकरण करण्याची मागणी ग्रामपंचायत वढु बु. आणि शंभुभक्तांकडून सातत्याने केली जात होती. या मागणीची दखल घेऊन खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार आणि ‘पीएमआरडीए’चे आयुक्त सुहास दिवसे यांना या रस्त्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली होती.

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री पवार यांनी निधी मंजूर करण्याचे निर्देश दिले होते. ‘पीएमआरडीए’ पहिल्या टप्प्यात प्रजिमा १९ वरील कोरेगाव भीमा ते वढु बु. या ३.२५० कि. मी. लांबीपैकी कि.मी. ००/०० ते कि.मी.९५० या लांबीतील रस्त्याचे १०.००/१२.०० मीटर रुंदीकरण व सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याच्या कामांसाठी रु. ६५८.२७ लक्ष इतक्या निधीच्या कामाला प्रशासकीय मंजुरी दिली. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या संदर्भात डॉ.अमोल कोल्हे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाला भेट देणाऱ्या शंभुभक्तांचा ओघ सातत्याने वाढत आहे. शिवाय पर्यटनवाढीसाठीच्या भक्ती-शक्ती कॉरिडॉरच्या माझ्या संकल्पनेनुसार पायाभूत सुविधा ही पहिली प्राथमिकता होती. त्यामुळे आमदार अशोक पवार आणि मी स्वतः मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निधीची मागणी केली होती. या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत पालकमंत्री पवार यांनी पीएमआरडीएला निधी देण्याचे निर्देश दिले. त्यामुळेच हे काम मार्गी लागले आहे.

Previous articleपिपंळे खालसाच्या सरपंचपदी सौ.सुप्रिया धुमाळ तर उपसरपंचपदी राजेंद्र धुमाळ यांची बिनविरोध निवड
Next articleबकोरीच्या डोंगरावर निसर्गप्रेमी तरुणांनी पशु-पक्षांसाठी पाण्याची केली व्यवस्था