आंबेगाव तालुक्यात सोने लुटण्याचा प्रयत्न जेष्ठ नागरिकाच्या सतर्कतेमुळे टळला..

सिताराम काळे

– घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील ग्रामीण रूग्णालया समोर मी सीआयडी मध्ये पोलीस विभागामध्ये काम करत असल्याची बतावणी करून ज्ञानेश्वर खंडागळे या जेष्ठ नागरिकाजवळील सोने लुटण्याचा प्रयत्न प्रसंग त्यांच्या सतर्कतेमुळे टळला.

आंबेगाव तालुका ज्ञानदा वारकरी दिंडीचे वारकरी ह. भ. प. ज्ञानेश्वर पंढरीनाथ खंडागळे (वय-७०. रा. आमोंडी) लुना मोटार सायकलवरून घोडेगावात येत असताना ग्रामीण रूग्णालयाच्या गेटसमोर सकाळी ११ ते ११.३० चे दरम्यान आले असता पाठमागुन येवुन एका अनोळखी व्यक्तिने त्यांच्या गाडी समोर आपली मोटार सायकल थांबवुन त्यांना गाडी बाजुला घेण्यास सांगितले. अन् त्यांस मी सीआयडी मध्ये पोलीस विभागात कामाला असुन येथे हरी शिंदे कुठे राहतात असे विचारले असता त्यांनी माहित नाही असे उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी तुंम्ही कुठे राहता असे विचारून त्यांची लुना मोटार सायकलची डिकी तपासणी करण्यास सुरूवात केली त्यावेळी त्यांनी काय तपासता असे विचारले असता, तुंम्ही गांजा, स्मगलींग असे दोन नंबरचे धंदे करत असल्याची माहिती आंम्हाला मिळाली असल्याचे सांगुन अंगावरील कपडयातील वस्तु तपासणी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तुमच्या हातातील अंगठया काढा असे सांगितले. त्यावेळी खंडागळे यांनी अंगठया बोटातुन निघत नाही असे सांगितले. तर त्याने माझ्याकडे पाणी आहे लगेच निघतील असे सांगितले. परंतु खंडागळे यांनी असे करण्यास नकार दिल्यामुळे संबंधित रस्ता नागरिकांनी गजबजलेला असल्याने अनोळखी व्यक्ति काही न बोलता निघुन गेली.

संबंधित बतावणी करणारी व्यक्ति अंदाजे सहा ते साडेसहा फुट उंचीची असुन तोंडाला मास्क लावलेली होती. अंगात स्वेटर व खाकी कलर टाईप पॅंन्ट घातलेली होती. तर मोटार सायकलला पोलीसांची काठी लावलेली होती.

या अगोदर मंचर परीसरामध्ये मागील महिन्यात असेच पोलीस असल्याची बतावणी करून एका ज्येष्ठ नागरिकाला लुटले गेलेले आहे.

याबाबत घोडेगाव साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार म्हणाले की पोलीस अधिकारी अथवा पोलीस कर्मचारी, पोलीस यंत्रणा नागरिकांना आपल्या जवळील सोने काढून द्या असे कधीच सांगत नाही, अशा भामट्यांन पासून नागरिकांनीही सावध राहायला पाहिजे, अशा घटना आढळून आल्यास तात्काळ त्या व्यक्तीचा गाडी नंबर किंवा फोटो काढावा जेणेकरून पोलीस यंत्रणेला तपास करणे सोपे जाईल.

Previous articleमराठी ज्ञानभाषा व्हावी – ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील
Next articleपुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये १४ मार्चपर्यंत राहणार बंद