मराठी ज्ञानभाषा व्हावी – ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील

राजगुरूनगर-मराठी ही फक्त मातृभाषा, राजभाषा न राहता  ज्ञानार्जनाची, ज्ञानसंवर्धनाची आणि ज्ञान देणारी भाषा होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील यांनी केले. ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित  “मोकळे आकाश” या ई- विशेषांकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते.

या वेळी  उपाध्यक्ष  नानासाहेब टाकळकर,  प्राचार्य डॉ. व्ही.डी. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ.संजय शिंदे,  डॉ. एस. बी. पाटील, प्रा.ए.जी. कुलकर्णी, प्रबंधक कैलास पाचारणे उपस्थित होते.

ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील पुढे म्हणाले, की मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी इंग्रजीप्रमाणे विज्ञान, तंत्रज्ञान, व्यापार, उद्योग, दळणवळण आणि कायद्याची भाषा म्हणून विकसित व्हायला हवी.

 ते म्हणाले, भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम असून प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगायला हवा. उत्तम मराठी भाषा लिहिता – वाचता येणे हे आनंददायी असते. मराठी भाषा समृद्ध असून मराठी साहित्याची गौरवशाली परंपरा आहे. या परंपरेतील साहित्यानुभव प्रत्येक मराठी जनाने घेण्याची गरज आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी शिक्षण पद्धतीतून बाहेर पडून ज्ञानात्मक, गुणात्मक स्तर उंचविण्यासाठी स्वयं अध्ययनाला महत्त्व देऊन उपक्रमशीलता वाढवायला हवी;  असे आवाहन त्यांनी केले.

मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून दि. २५ रोजी कुसुमाग्रजांच्या कवितांचा ‘काव्यजागर’,  दि. २६ रोजी डॉ. संजय शिंदे यांचे  ‘समाजमाध्यमातून मराठीचा प्रचार व प्रसार’ या विषयावर व्याख्यान तर दि. २७ रोजी  प्रा.साईनाथ पाचारणे यांनी लेखन कार्यशाळेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय शिंदे यांनी तर आभार डॉ. बाळासाहेब अनुसे यांनी मानले.

Previous articleघोटवडीच्या सरपंचपदी विष्‍णु दळवी,उपसरपंचपदी अश्विनी धंद्रे यांची बिनविरोध निवड
Next articleआंबेगाव तालुक्यात सोने लुटण्याचा प्रयत्न जेष्ठ नागरिकाच्या सतर्कतेमुळे टळला..