गावपातळीवर सांडपाणी व घनकच-याचे व्यवस्थापन करणे काळाची गरज – गटविकास अधिकारी जालींदर पठारे

Ad 1

सिताराम काळे, घोडेगाव

– सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सर्वांनाच काळजीत टाकणारा आहे. समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेचे प्रेरक म्हणून भूमिका पार पाडावी. तसेच ग्रामपंचायत पातळीवर या संदर्भामध्ये उपाययोजना करण्यात यावी अशी सुचना यावेळी पंचायत समिती सभापती संजय गवारी यांनी केली.

पंचायत समिती आंबेगाव येथील सभागृहात तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक यांचे एकदिवशीय सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पंचायत समिती सभापती संजय गवारी बोलत होते. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, गटविकास अधिकारी जालींदर पठारे, सहायक गटविकास अधिकारी जे. के. लहामटे, मेघा येडे, इनोरा कंपनीच्या समन्वयक नुतन भाजेकर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन तज्ञ प्रविण खंडागळे, गटसंसाधन केंद्राचे तालुका समन्वयक पंकज चौधरी, विस्तार अधिकारी हुजरे आदिंनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध पैलुंवर चर्चा केली.

गटविकास अधिकारी जालींदर पठारे म्हणाले, शाश्वत स्वच्छतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी शौचालयाच्या नियमित वापरासह गावस्तरावर सांडपाणी व घनकच-याचे शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थापन करणे काळाची गरज असल्याचे सांगितले.