पुणे जिल्हा परीषदेच्या संयुक्त शाळांना ३ कोटी ६९ लाख रुपयांचे अनुदान मंजुर

Ad 1

सिताराम काळे

– महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग समग्र शिक्षा उपक्रमांतर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने सन २०२०-२१ साठी पुणे जिल्हा परिषदेच्या ३ हजार ७२४ शाळांना ३ कोटी ६९ लाख १० हजार रूपये संयुक्त शाळा अनुदान मंजुर झाले असुन यातील ७० टक्के रक्कम तालुका स्तरावर वितरीत करण्यात आली आहे.

समग्र शिक्षा अंतर्गत २०२०-२१ वार्षिक कार्ययोजना व अंदाज पत्रकास प्रकल्प मान्यता मंडळाच्या १८ जुन २०२० च्या बैठकीमध्ये संयुक्त शाळा अनुदान उपक्रमास मंजुरी मिळाली आहे. सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षकांचे शिक्षण या केंद्रपुरस्कृत योजनांचे एकत्रीकरण करून समग्र शिक्षा अभियान ही योजना सन २०१८-१९ पासून सुरू करण्यात आली आहे. सदरचे संयुक्त शाळा अनुदान हे शासकीय आदिवासी विभागांकडून चालविलेल्या आश्रमशाळा, समाजकल्याण विभागाकडून चालविलेल्या शाळा, विदयानिकेतन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांसाठी मंजुर आहे.

शाळांची रंगरंगोटी, स्टेशनरी, चार्ट, तक्ते, आराखडा, बोलक्या भिंती असणा-या शाळा तयार करण्यासाठी तसेच आधुनिक पध्दतीने दिले जाणारे शिक्षण, संगणकाचा वापर, इंटरनेट, भौतिक सुविधांची उपलब्धता यासाठी या निधीचा उपयोग होणार आहे. तसेच १० टक्के निधी स्वच्छ कार्य योजना या उपक्रमावर खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

समग्र शिक्षा निधीमुळे जिल्हा परीषद शाळांना उर्जितावस्था प्राप्त झाली आहे. सरकारी शाळांसाठी हे अनुदान गरजेचे आहे. संयुक्त शाळा अनुदान मंजुर झाल्याने पायाभुत सुविधांची दुरूस्ती करण्यास मदत होणार आहे. मात्र छोटया शाळांसाठी मिळणारे अनुदान तुटपुंजे आहे. यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे पाठपुरावा करणार असल्याचे पुणे जिल्हा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय वाळुंज यांनी सांगितले