वाघोलीत ‘रयतेच्या राजा’ला जयंतीनिमित्त अभिवादन

गणेश सातव, वाघोली

वाघोली(ता-हवेली )येथे स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पुणे-नगर महामार्गालगत असणाऱ्या व वेशीजवळ असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अनेक राजकीय,
सामाजिक संघटना व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले.वाघोली मुस्लिम वेलफेअर असोसिएशनच्यावतीनेही जामा मस्जिद परिसरात शिवप्रतिमेला अभिवादन करुन शिवजयंती साजरी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीतील मावळ्यांना एकत्र करुन स्वराज्याची स्थापना केली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्री-पुरुष,गरिब-श्रीमंत, असा भेदभाव न होता सर्व जाती धर्मातील लोकांना समान न्याय मिळत होता.अनेक मुस्लीम धर्मिय मावळे स्वराज्याच्या निर्मिती व रक्षणात पुढे होते.काही तरुण महाराजांचे अंगरक्षक होते,तर काही जण घोडदळ,पायदळाचे प्रमुख होते.नव्हे नव्हे तर अनेकांनी वेळप्रसंगी आपल्या जीवाची बाजी लावून महाराजाच्या आज्ञेचे इमानेइतबारे निष्ठेने पालन केले होते.

वाघोलीत अनेक तरुण मंडळे,प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंती साजरी होत असताना मुस्लिम वेलफेअर असोसिएशनही मागे राहिले नाही.असोसिएशन व जामा मस्जिद ट्रस्टच्यावतीने राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक जान मोहम्मद पठान यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्त्यांनी शिवजन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleकैं.गजाननराव कानडे यांच्या पुण्यतिथी निमित्त जऊळके बु येथील शाळेला टिव्ही संच भेट
Next articleपिंपळे खालसाला आर.आर पाटील सुंदर गाव पुरस्कार