छत्रपती शिवरायांचे तेज संपूर्ण जगामध्ये आपल्याला पसरवायचे आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नारायणगाव (किरण वाजगे)

छत्रपती शिवरायांचा संपूर्ण इतिहास आपल्या मनामध्ये जिवंत आहे. परंतु छत्रपती शिवरायांचे तेज आपल्याला संपूर्ण जगात पसरवायचे आहे. यासाठी जे जे काही करायला लागेल ते ते करण्याची आपली तयारी आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज किल्ले शिवनेरी गडावर केले.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन सभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन राज्यमंत्री  आदित्य ठाकरे, छत्रपती खासदार संभाजी राजे भोसले, खासदार डॉ अमोल कोल्हे, आमदार विनायक मेटे, स्थानिक आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष पांडुरंग पवार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, मराठा सेवा संघाचे  प्रदेशाध्यक्ष  विजय घोगरे, अर्जुन तनपुरे, महेश घाडगे, राजेंद्र डुबल, मंदार बुट्टे, युवा सेनेचे गणेश कवडे, जुन्नर नगरपरिषदेचे अध्यक्ष श्याम पांडे, उपवनसंरक्षक जयरामे गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पुरस्कारार्थी  संकेत भोंडवे, डॉ सदानंद राऊत तसेच अनेक अधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते.


यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, हे सलग दुसरे वर्ष आहे, शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी गडावर उपस्थित राहण्याचा बहुमान शिवरायांच्या व जिजाऊंच्या आशीर्वादाने तसेच तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आम्हाला लाभला आहे,
शिवरायांच्या चरणी नतमस्तक व्हायला शिवजयंतीच पाहिजे असा काही मुद्दा नाही, शिवआपल्या मनामध्ये हृदयामध्ये अखंड एक स्थान आहे. आणि कधीही कुठेही कोणत्याही कामाला निघताना छत्रपतींचे स्मरण नकळत होते. कोणतेही चांगले काम पवित्र काम चालू करायचे म्हटल्यावर छत्रपती शिवरायांचे नाव आठवते. कारण ते आपल्या रक्तातच आहे आज शिवनेरी वर आल्यानंतर वातावरण खूप छान आहे सर्व काही छान आहे मात्र तोंडावर मास्क आहे.

महाराष्ट्र म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे वेगळे करता येऊ शकत नाही आणि ज्या मातीत हे तेज जन्माला आलं त्या मातीची आपण लेकरे आहोत. छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या स्वराज्यावर चालून आला त्यांची महाराजांनी कशी विल्हेवाट लावली ते आपल्या सर्वांना माहीत आहे. तशी युद्धे आता जरी नसली तरी कोरोना बरोबर आपली लढाई सुरू आहे. मास्क ही आपल्या या युद्धाची ढाल आहे. हे विसरू नका नुसती तलवार घेऊन लढणे योग्य नाही. बाजीप्रभू दोन्ही हातांनी तलवार घेऊन लढले.

छत्रपती शिवाजी महाराजांना आपण दैवत का मानतो. कारण अनेक राजे होऊन गेले . अनेक लढाया झाल्या. अनेक युद्ध जिंकली गेली अनेक युद्ध हारली गेली. अनेक राज्ये स्थापन झाली, अनेक राज्ये विलयाला गेली. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये वेगळेपण काय आहे तर, लढण्यासाठी तलवारीची आवश्यकता असतेच नुसती तलवार घेतली म्हणजे युद्ध जिंकता येते असे नाही. तर ती तलवार पकडण्याची जिद्द लागते. युद्ध जिंकण्याची एक ईर्षा लागते, निश्चय लागतो, जिगर लागतो आणि ती प्रेरणा छत्रपतींनी दिली. आणि छत्रपती शिवाजी महाराज आज कितीही वर्ष झाली, म्हणजेच तीनशे वर्ष, चारशे वर्षे, हजारो वर्ष झाली तरी शिवाजी महाराज हे आपले दैवतच राहणार म्हणून या दैवताला वंदन करण्यासाठी आपण शिवनेरी गडावर आलो आहोत. असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार आयएएस अधिकारी संकेत भोंडवे यांना देण्यात आला व शिवनेर भूषण पुरस्कार सर्पदंशावर अनेक वर्षे कार्य करणारे डॉ सदानंद राऊत यांना देण्यात आला या विषयी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, समाजात काही साप असतात ते दंश करत असतात त्यावर इलाज असतो , तो म्हणजे अशा सापांना वेळेला ठेचावे लागते. म्हणून अशा डॉक्टरांची आवश्यकता आहे.
आज आपण शिवयोग म्हणून एक संकल्पना मांडली. ज्याद्वारे आपण योगायोगाने म्हणजेच शिव योगाने परिसरात शिवसुमन मिळाले आहे. ज्यांनी हे फूल शोधले आहे त्यांचे मी कौतुक करतो असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, दरवर्षी आपण शिवजयंती उत्साहात साजरी करतो. परंतु या वर्षी कोरोनामुळे मर्यादा आल्या आहेत. आपण पाहतोय की विदर्भामध्ये अमरावती अकोला यवतमाळ या परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. सार्वजनििक आरोग्यमंत्री गृहमंत्री काही दिवसांपूर्वी कोरोना च्या काळामध्ये घराघरात फिरलेे आहेत परंतु त्यांनाही या आठ दिवसात कोरोनाची लागण झाली आहे. म्हणून शिवजयंती मर्यादित स्वरूपात साजरी करण्याचा निर्णय आपल्याला घ्यायला लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आज हयात असते तर त्यांनी देखील रयतेचा जीव धोक्यात टाकण्याचा निर्णय घेतला नसता त्या काळात देखील छत्रपती शिवाजी महाराजांची दृष्टी होती विचार होता हा विचार किती महत्त्वाचा होता ते प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला सर्वांना जाणवते शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे कैवारी होते रयतेचे राजे होते त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य सत्ता उपभोगण्यासाठी नव्हते तर शेतकऱ्यांच्या रयतेच्या कल्याणासाठी होते रयतेला धोका निर्माण होणार नाही असा कोणताही निर्णय महाराजांनी घेतला नाही.मागील वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २३ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी जाहीर केला होता. तो निधी या वर्षी विविध विभागांना वर्ग करण्यात आला आहे. या विविध विभागातून होणारे काम सर्व अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे व दर्जेदार करावे. असे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जीवनगौरव पुरस्कार मिळालेले संकेत भोंडवे व डॉ सदानंद राऊत यांचे अभिनंदन अजित पवार यांनी केले.

छत्रपती संभाजी राजे यांनीदेखील यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलदुर्गाबद्दल माहिती दिली. मुंबई राजधानी ते रायगड या जलमार्गा द्वारे जोडून म्हणजेच सी फोर्ट सर्किट टुरिझम द्वारे मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया पासून निघाल्यानंतर खांदेरी किल्ला, उंदेरी किल्ला, कुलाबा किल्ला, पद्मदुर्ग किल्ला , मुरुड जंजिरा किल्ला व त्या पुढे गेल्यानंतर सावित्री नदी द्वारे ३५ किलोमीटरवर रायगड किल्ला हा जलमार्ग जर जोडला तर अतिशय सुंदर जलदुर्ग टुरिझम करता येऊ शकते. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे सकारात्मक धोरण अवलंबतील असा विश्वास आहे व त्यामुळे सर्व जगाला शिवछत्रपतीं ची वेगळी ओळख पाहायला मिळेल असेही संभाजीराजे यांनी सांगितले.
यावेळी आमदार अतुल बेनके यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश जगताप यांनी केले तर आभार महेश घाडगे यांनी मानले .

चौकट..

इंगीत विद्याशास्त्र भाषा

छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक भाषा येत होत्या त्यामधील समोरच्या माणसाच्या मनात काय चालले आहे  हे समजणारी “इंगीत विद्याशास्त्र ही भाषा” त्यांना अवगत असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी आपल्या भाषणात सांगितले. तसेच ही भाषा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील येते. त्यामुळे अजित पवार हे समोरच्याच्या मनात काय चालले आहे हे शोधतात.
यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाब्दिक कोटी करून मला देखील अजित पवारांना अवगत असलेली इंगीत विद्याशास्त्र ही भाषा आता शिकायची आहे. म्हणजे ही भाषा मी शिकलो तर अजित दादांच्या मनात काय चालले आहे ते मला कळेल. अजित दादांनी मास्क घालू दे, अथवा गॉगल लावू दे, तरी देखील त्यांच्या मनात काय सुरू आहे  हे मी ही भाषा शिकल्यानंतर ओळखून दाखवेल. असे मुख्यमंत्री बोलताच  शिवप्रेमी मध्ये एकच हशा  पिकला .

शिवजयंती उत्सवातील ठळक वैशिष्ट्ये

शिवजयंतीनिमित्त आज सकाळी सात वाजता किल्ले शिवनेरी गडावरील शिवाई देवीची शासकीय पूजा जिल्हाधिकारी राजेश देशमुख व आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते झाली.

प्रथम उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सकाळी ८:५० वाजता हेलिकॉप्टरने आगमन झाले.

 तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ९:१५ वाजता हेलिकॉप्टरने आगमन झाले.

गडावरील शिवकुंज ह्या शिवजन्मस्थळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच छत्रपती संभाजी राजे आमदार खासदार यांच्या हस्ते बाल शिवाजीचा पाळणा हलविण्यात आला.

शिवजन्मस्थळावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर महाराष्ट्र पोलीसांनी बँड पथकासह राष्ट्रगीत गात हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून महाराजांना मानवंदना दिली.

सन १८६५ साली फ्रेरेरा इंडिका नावाच्या वनस्पतीचा शोध शिवनेरी किल्ल्यावर इंग्रज संशोधकाने लावला होता. या वनस्पतीचे आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिव सुमन असे नामकरण करून पोस्ट तिकीट अनावरण करण्यात आले.

यावेळी आदिवासी लेझीम पथकाने आकर्षक पारंपरिक लेझीम कवायती केल्या.

शिवजन्मस्थळा पासून ते जिजामाता व बाल शिवाजी पुतळ्यापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. ही पालखी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व प्रमुख पाहुण्यांनी काही काळ खांंद्यावर घेतली.

 जिजामाता व बाल शिवाजी पुतळ्याचे पूजन केल्यानंतर मराठा सेवा संघाने आयोजित केलेल्या अभिवादन सभेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी संबोधित केले

 याच अभिवादन सभेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्काराने आय ए एस अधिकारी संकेत भोंडवे यांना गौरवण्यात आले. तसेच नारायणगाव येथील डॉ सदानंद राऊत यांना शिवनेरी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Previous articleघोडेगाव परीसरामध्ये शिवजयंती साजरी
Next articleघोडेगाव परीसरामध्ये शिवभक्तांनी शिवजयंती साधेपणाने केली साजरी