अट्टल खंडणीबहाद्दर हरीश कानसकरसह सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल

प्रमोद दांगट

आंबेगाव तालुक्यातील अट्टल
खंडणीबहाद्दर हरीश कानसकर व त्याच्या इतर सहा साथीदारांनी एका व्यक्तीचे मंचर बस स्थानकातून अपहरण करत त्याला एका बंद खोलीत विवस्त्र करून मारहाण करून त्याचा विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून व व्हिडीओ चित्रण करून व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून दोन लाखाची खंडणी मागितली असल्याची तक्रार मंचर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार हरीश कानसकर व त्याला साथ देणारे सहा साथीदार नवनाथ बन्सी थोरात, सागर संतोष वाघ ( तिघेही ,रा. रांजणी , ता.आंबेगाव ) मनीष हरीश हांडे ( पुणे ),प्रीतम हनुमान भालेराव ( रा. कळंब , ता. आंबेगाव ) गणेश उर्फ बंटी एलभर ( रा. अवसरी ,ता.आंबेगाव ) सिद्धेश वायकर (रा.मंचर,ता.आंबेगाव ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , मंचर एसटी बसस्थानकाच्या आवारातून फिर्यादी जात असताना कानसकरसह त्याच्या साथीदारांनी त्याला बोलवले. त्याला विशेष पोलीस अधिकारी लिहिले ओळखपत्र कानसकरने दाखवत धमकी दिली. यावेळी फिर्यादीला याला आजच गायब करायचे असे म्हणून कानसकर आणि त्याच्या सहकार्यांनी फिर्यादीला इन्होवा गाडीत उचलून नेले. त्याचे तोंड दाबून ठेवत फिर्यादीला मंचर येथील कानसकरच्या घरामध्ये नेले. तेथे त्याला विवस्त्र करून जबर मारहाण करत त्याचे छायाचित्र आणि व्हिडिओ काढून कानसकरसह इतर सहा जणांचे पाय धरुन माफी मागायला लावली. तसेच पुन्हा मंचर हद्दीत दिसला तर तुझे छायाचित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी बदनामी करू असे धमकावून तीन तास घरामध्ये डांबून ठेवले. तसेच जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रात्रीच्या वेळी फिर्यादी त्यांच्या कुटुंबीयांसह घरामध्ये असताना कानसकरसह इतर दोघांनी फिर्यादीच्या घरामध्ये जबरदस्तीने घुसून दोन लाखांची मागणी केली. जर ते दिले नाही तर सर्व छायाचित्र आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने फिर्यादीच्या पत्नीने घरातील दहा हजार रुपये कानसकरला दिले.

तसेच फिर्यादिस अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या पाठीमागील जंगलातही नेले होते. तेथे फिर्यादीकडून पैशांची मागणी करत शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्जुन शिंदे करीत आहे.

मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी जनतेला कानसकर विषयी पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहन केल्यानंतर कानसकर याचे नवनवीन गुन्ह्यांच्या भानगडी बाहेर येण्यास सुरवात झाली आहे. त्याला विविध गुन्ह्यांमध्ये साथ देणारे साथीदारही पोलिसांच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळे एका महिन्यात कानसकर याच्यावर फसवणूक ,धमकी ,खंडणी , अपहरण, मारहाण असे एकूण अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. समाजामध्ये सज्जन ,विद्वान ,अभिनेता ,दिग्दर्शक , सामाजिक सेवक, आरटीआय कार्यकर्ता ,पोलीस विशेष अधिकारी म्हणून वावरणारा , भोळाबाबडा चेहरा दाखवून गोरगरीब लोकांना फसविणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या खंडणीबहाद्दरचा खरा गुन्हेगारीचा चेहरा श्री. कोरे यांनी एका महिन्यातच जनतेपुढे आणला आहे.अनेक गुन्हे करून तालुक्यात आपला नाद कोण करत नाही अश्या थाटात फिरणाऱ्या हरीश कानसकरचा नाद मात्र पोलिसांनी पूर्ण केला असल्याची चर्चा नागरिक करत आहे.

Previous articleपारनेर बस स्थानकातून आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून अष्टविनायक दर्शनासाठी भाविकांना अल्प दरात बस उपलब्ध
Next articleसतीश भाकरे सारखे प्रामाणिक बातमीदार होणे दुर्मिळ – जेष्ठ पत्रकार संतोष वळसे पाटील यांनी दिला आठवणींना उजाळा