महिलेच्या विनयभंगप्रकरणी दोघांना दोन वर्षाचा कारावास

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये २०१९ साली एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जुन्नर शहरातील दोन आरोपींना जुन्नर न्यायालयाचे न्यायाधीश व्ही आय घोरपडे यांनी दोन वर्षाचा कारावास व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा आज ठोठावली आहे. अशी माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

याप्रकरणी आरोपी प्रतीक चंद्रकांत शेरकर (वय २५, राहणार दिल्ली पेठ, जुन्नर शहर व अजय बाळासाहेब कंगले (वय ३२, राहणार माळीवाडा, जुन्नर शहर, जिल्हा पुणे) या आरोपींनी नारायणगाव आर्वी फाटा येथे रिक्षाने जात असलेल्या एका महिलेचा विनयभंग केला होता. ही महिला आपल्या रिक्षा चालक पतीसोबत रिक्षामध्ये मागील सीटवर बसली होती वरील दोघा आरोपींनी दुचाकीवर येत रिक्षा अडवून पीडित महिलेला हातवारे करत व तिच्या पायाला पाय लावून छेडछाड केली होती.
याप्रकरणी या दोन्ही आरोपींवर गुन्हा रजिस्टर नंबर २१५/१९ – आयपीसी कलम ३५४ डी, ५०४, ५०६, ३४ या कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता. यापैकी कलम ३५४ डी या कलमानुसार दोन्ही आरोपींना दोषी धरून न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.

याप्रकरणी सरकारी वकील ए एस वर्पे यांनी काम पाहिले. घटनेचा तपास पोलीस नाईक व्ही व्ही जांभळे यांनी केला. तर सरकारी पक्षातर्फे न्यायालयीन कामकाज पोलीस नाईक एस डी शितोळे व पोलीस कॉन्स्टेबल राक्षे यांनी पाहिले.

Previous articleघोडेगाव- संगणकीकृत सात बारा मधील चुका दुरूस्त शिबिर संपन्न
Next articleकळमोडी योजनेचे प्रलंबित असलेले काम करण्याची मागणी