फ्लॉवरचे बाजारभाव कोसळल्याने पूर्व हवेलीतील शेतकरी आर्थिक संकटात

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

फ्लॉवर भाजी पिकाचे बाजारभाव कोसळल्याने पूर्व हवेलीतील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. चालू फ्लॉवर शेतीत गुरे सोडल्याची घटना भवरापूर (ता. हवेली ) येथे नुकतीच घडली आहे.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत महागडी औषधे, खते, मजुरी, वाहतूक खर्च, परवडत नसल्याने भवरापूर येथील शेतकरी भिमराव यशवंत टिळेकर यांनी आपल्या दोन एकर फ्लॉवर भाजीच्या पिकांमध्ये जनावरे, व मेंढ्या सोडुन दिल्याची माहिती टिळेकर यांनी आवाज जनतेचाशी बोलताना दिली.

एकरी पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च करून बाजारपेठेत एका पिशवीला ५० ते ६० रुपये भाव मिळत आहे. त्यानुसार किलोला तीन ते चार रुपये किलोप्रमाणे फ्लॉवरला भाव मिळत आहे. अशा कवडीमोल भावाने शेतकऱ्यांनी केलेला खर्चही वसूल होत नाही. कष्टाने पिकवलेल्या मालास योग्य दाम मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, थेऊर, आळंदी म्हातोबा, शिंदवणे, व उरुळी कांचन या गावांमध्ये  शेतकऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. फ्लॉवर पिकासाठी ७० दिवसांचा कालावधी लागतो. कमी दिवसात फ्लॉवरचे पीक घेता येत असल्याने बरेच शेतकरी फ्लॉवरचे उत्पादन घेतात.परंतु बाजारभाव कोसळल्याने नाविलाजाने मेंढ्या सोडव्या लागल्या आहेत.

रोप विकत घेण्यापासून ते महागडी औषधे फवारणी करणे, पाणी देणे, खुरपणी व देखभाल खर्च, त्यातच  बाजारपेठेत घेऊन जाईपर्यंत पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च करावा लागत आहे. अगोदरच कोरोना या महामारीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच मालाला बाजारभाव नसल्याची खंत टिळेकर यांनी व्यक्त केली. अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

तसेच उरुळी कांचन (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील तांबेवस्ती  येथील शेतकरी आबुराव कोंडीबा तांबे यांनी एक एकर क्षेत्रातील फ्लॉवर शेतीत ट्रॅक्टर रोटावेटरच्या सहाय्याने फ्लॉवर पिकात  नांगरणी केली आहे.

Previous articleमराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॕड.शशिकांत उर्फ आप्पासाहेब पवार यांची दौंड तालुका मराठा महासंघाला सदिच्छा भेट
Next articleसिमेंटचा खांब पडून एकाचा मृत्यु