खेड, आळंदी व चाकणसह ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वाढ करावी -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून खेड, आळंदी व चाकणसह ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वाढ करावी तसेच संस्थात्मक विलगीकरण, कोरोना चाचणी व कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्क शोध मोहिमेसाठी स्वतंत्रपणे समन्वयासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिले.

राजगुरुनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात खेड, आळंदी व चाकणसह ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार दिलीप मोहिते, सभापती अंकुश राक्षे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उप विभागीय अधिकारी संजय तेली यांच्यासह लोकप्रतीनिधी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामीण भागातूनही मोठया प्रमाणात सहकार्य मिळत आहे. मात्र काही प्रमाणात नागरिक अनावश्यक गर्दी करतांना दिसून येत आहेत. येणाऱ्या दिवसात आपण अधिक दक्ष राहून कोराना मुक्तीसाठी काम करु. गावपातळीवर बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींना तसेच कोरोना बाधित व्यक्तिंच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरण करणे आवश्यक आहे. जेणेकरुन आपले गाव कोरोना विषाणूपासून मुक्त राहु शकेल. सर्दी, ताप, खोकला व श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्तींना नजीकच्या फिव्हर क्लिनिकमध्ये तातडीने पाठविणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

खाजगी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दाखल करुन घ्यावे व कोणत्याही रुग्णाला परत पाठवू नये. रुग्णाला दाखल करुन घेण्यास खाजगी रुग्णालयानी टाळाटाळ करु नये, अशा स्पष्ट सूचना देत जिल्हाधिकारी राम म्हणाले. कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता तालुक्यामध्ये कोविड केअर सेंटर, कोविड आरोग्य तपासणी केंद्र वाढवावेत तसेच कन्टेंन्मेंट झोनमधील नागरिकांची प्राधान्याने आरोग्य तपासणी करावी. कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील व्यक्तिंचा अत्यंत कोटेकोरपणे शोध घेणे आवश्यक आहे. तसेच संस्थात्मक विलगीकरण केंद्रावर देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा दर्जेदार असायला हव्यात. कोरोना चाचणी व कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्क शोध मोहिमेसाठी स्वतंत्रपणे समन्वयासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करावी तसेच कोरोना संदर्भात तालुकास्तरावरील संपर्क केंद्र गतिमान करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.

पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी अत्यावश्यक सेवा व इतर महत्वाच्या कामाशिवाय अनावश्यक गर्दी करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना अधिक गतिमान करण्याच्या सूचना देतांनाच लग्न समारंभात शासनाने घालून दिलेल्या नियमापेक्षा जास्त गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.

आमदार दिलीप मोहिते यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधी मिळून कोरोनाचे संकट दूर करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Previous articleराजगुरुनगर मध्ये सोशल डिस्टनसचे नियम धाब्यावर बसवत नागरिकांची खरेदीसाठी गर्दी तर दारू खरेदीसाठी झुंबड
Next articleनिरगुडसर येथून ३३ वर्षीय विवाहित तरुणी बेपत्ता